आमदार रवींद्र वायकर यांची १० तास ईडी चौकशी; ५०० कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा
By मनोज गडनीस | Published: January 29, 2024 09:11 PM2024-01-29T21:11:16+5:302024-01-29T21:11:32+5:30
सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते.
मुंबई - जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) दहा तास चौकशी केली. सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते.
यापूर्वी १७ जानेवारी व २३ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझी तब्येत बरी नसल्यामुळे यापूर्वी मी ईडीच्या चौकशीला आलो नव्हतो. मी कायद्याच्या कक्षेत राहून काम केले आहे. चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. ज्या क्लबच्या विरोधात तक्रार केली तो १९ वर्षापासून सुरू होता. तेव्हा तक्रारी नव्हत्या. मान्यता दिल्या त्या प्रमाण दोन वर्षे काम झाले. पण राजकीय दबाव आल्यामुळे त्या बांधकामाला स्थगिती दिली. आम्ही त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, असेही ते म्हणाले.