मुंबई - दही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र, या उत्साहाला काही गोविंदा जखमी झाल्याने गालबोट लागलं असून काही जखमी गोविंदांना उपचारासाठी जे. जे. आणि परळमधील के. ई. एम. , मुलुंडच्या अगरवाल, सांताक्रूजच्या वि. एन. देसाई दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 121 गोविंदा जखमी झाले असून जे. जे. , केईएम , नायर , अग्रवाल , राजावाडी , महात्मा फुले , व्ही. एन. देसाई , भाभा , एस. के. पाटील , पोदार या रुग्णालयात जखमी गोविंदावर उपचार करण्यात येत आहे. 95 गोविंदांवर उपचार करून सोडण्यात आले तर 26 गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविराज गंगाराम चांदोरकर (वय ३५) हे शिवडीतील कालेश्वर गोविंदा पथकाचा गोविंदा असून त्यांना प्लास्टर करून के.ई. एम. रुग्णालयातून सोडून देण्यात आलं आहे तर वडाळ्यातील श्री गणेश गोविंदा पथकातील जान्हवी जयवंत पाताडे (वय १४) हिला पायाला मार लागला असून के. ई. एम. रुग्णालयात तिच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तसेच श्री गणेश गोविंदा पथकातील मनाली सुधीर मेने (वय 18), शिवडीतील न्यू लेबर कॅम्प गोविंद पथकातील शंकर बाबुराव कागलाराम (वय ५१), अमेय हिराचंद पाटील (वय 25) आणि मयूर महादेव नाईक (वय २६) हे वडाळ्यातील यश गोविंदा पथकातील गोविंदा आणि यज्ञ बाळकृष्ण मोरे (वय १७) यांच्यावर के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे काल खार दांडा सरावादरम्यान १४ वर्षीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खार येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळीच आमदार अॅड. आशिष शेलार यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन 1 लाखाची मदत केली आहे.