ठाण्यात घर घेणे १० लाखांनी महाग
By admin | Published: January 2, 2015 11:05 PM2015-01-02T23:05:14+5:302015-01-02T23:05:14+5:30
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मुंबईसह राज्यभरासाठी नवीन रेडीरेकनर दर लागू केले आहेत. ठाण्यासाठी हे दर २० टक्के झाल्याने शहरातील घरे आता आणखी महाग होणार आहेत.
अजित मांडके ल्ल ठाणे
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मुंबईसह राज्यभरासाठी नवीन रेडीरेकनर दर लागू केले आहेत. ठाण्यासाठी हे दर २० टक्के झाल्याने शहरातील घरे आता आणखी महाग होणार आहेत. त्यामुळे यापुढे ठाण्यात आपल्या स्वप्नातील घर घेण्याचा विचार करणाऱ्यांना सुमारे १० लाख अधिकचे मोजावे लागणार आहेत़
दरवर्षीप्रमाणे राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरचे दर १ जानेवारीला जाहीर केले आहेत. वर्षभरात राज्यातील खरेदी-व्रिक्रीची उलाढाल पाहून हे दर ठरवले जातात. फ्लॅटची खरेदी-विक्री करताना राज्य सरकारला द्याव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीसाठी रेडीरेकनर हा आधार मानला जातो. २०१४ मध्ये रेडीरेकनरचे दर १३ टक्के वाढले होते. याचा फटका आता घरांची खरेदी-विक्री करणाऱ्यांबरोबरच मालमत्ता कर भरणाऱ्यांनाही बसणार आहे. मागील वर्षी रेडीरेकनरच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. याचा बिल्डर व लोकांकडून त्यास विरोध झाल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती कमी करण्यात आली होती. विशेष म्हणजे आता ज्या भागात इमारतींचे काम अधिक प्रमाणात सुरू आहे, त्या भागांचे दर अधिक वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका ठाण्यात जास्तीचा बसणार आहे.
सध्या ठाण्यातील घोडबंदर भागात नव्याने गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. त्याखालोखाल कळवा, वर्तकनगर, उपवन, नौपाडा आणि शहराच्या मध्यवर्ती भागात कामे सुरू आहेत. सध्या ठाण्यात प्रति चौरस फूट दर ५ हजारांपासून २० हजारांपर्यंत आहे. परंतु, आता रेडीरेकनरचे दर वाढल्याने यात सुमारे एक हजारांची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यानुसार, आपल्या स्वप्नातील वन बीएचके म्हणजेच वन बेड रूम किचन फ्लॅट घेण्याचा विचार करणाऱ्यांना सुमारे स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क व इतर करांसह सुमारे १० लाख अधिकचे मोजावे लागणार आहेत. परंतु, मोठा फ्लॅट घ्यायचा असेल तर आणखी चार ते पाच लाखांचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे.
सध्या ठाणे शहरात घोडबंदरसह विविध भागांत सुमारे २०० इमारतींची कामे नव्याने सुरू असल्याची माहिती ठाणे बिल्डर असोसिएशनच्या सूत्रांनी दिली. परंतु, आता रेडीरेकनरचे दर वाढल्याने या इमारतींच्या फ्लॅटचे दरही वाढविण्यास बिल्डरने सुरुवात केली आहे. यामुळे बिल्डरांच्या प्राप्तिकरातही वाढ होणार आहे. परंतु, ही वाढ किती असेल, ही माहिती देण्यास असोसिएशनच्या सूत्रांनी नकार दिला.
तसेच रेडीरेकनरचे दर वाढल्याने आता स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, सेवा कर, व्हॅट आणि स्थानिक संस्था कर असे मिळून ११ टक्के अधिकचे मोजावे लागणार आहेत. सध्या साधारणपणे वन बीएचकेसाठी प्रति चौरस फुटांप्रमाणे सुमारे १ लाख ४८ हजार मोजावे लागत होते. परंतु, आता त्याऐवजी सुमारे १ लाख ५५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. नोंदणी शुल्कापोटीदेखील काही टक्के रक्कम अधिक मोजावी लागणार आहे.
पालिकेच्या शहरविकास विभागालादेखील रेडीरेकनरच्या वाढत्या दराचा फायदा होणार असून शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मोकळी जागा, स्टेअरकेस, डेव्हलपमेंट चार्जेस आदींसह इतर अधिकचे चार्जेस बिल्डरला भरावे लागणार आहेत. तसेच, अग्निशमनलादेखील याचा फायदा होणार आहे. त्याशिवाय, स्टॅम्प ड्युटीच्या १ टक्के रक्कम ही स्थानिक संस्था करापोटी पालिकेला मिळणार असल्याने एलबीटीमध्येही वाढ होणार आहे.