१० लाख ५५ हजार ग्राहकांनी भरले ३०० कोटींचे वीजबिल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:02 PM2020-07-08T18:02:55+5:302020-07-08T18:03:38+5:30
महावितरणचा वेबिनार, मदतकक्ष द्वारे ग्राहकांशी सुसंवाद, ग्राहक समाधानी
मुंबई : जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर दिलेले वीजबिल अचूक असल्याबाबत महावितरणच्या भांडूप परिमंडलतील ग्राहकांना वेबिनार, ग्राहक शिबीर, मोबाईल, तसेच प्रत्यक्ष संवाद साधून वीजबिलाबाबत माहिती देण्यात येत आहे. या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून भांडुप परिमंडलातील १० लाख ५५ हजार ग्राहकांनी जून महिन्याचा ३०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने याकाळात महावितरणसह, राज्यातील सर्व वीज वितरण कंपनींना कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मीटर रिडींग न घेता सरासरी रिडींग प्रमाणे ग्राहकांना वीजबिल देण्याबाबत निर्देश दिले होते. कोरोना संसर्ग व प्रसार हाेवु नये म्हणून एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्यामुळे, राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्याचे वीजबिल; हिवाळ्यातील डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्याचा सरासरी वीजवापरा नुसार देण्यात आले होते. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असून ग्राहकांचा वीजवापर नेहमीप्रमाणे जास्त असतो. परंतु, यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे सर्व जण घरी होते. त्यामुळे टीव्ही, पंखा, एअर कंडिशन, फ्रीझचा वापर अजून जास्त होता. लॉकडाऊनमुळे लोक घरातून काम करत असल्यामुळे त्यांच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापरही नेहमीपेक्षा जास्त होता. जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष मीटर रिडींग जूनमध्ये घेण्यात आले तेव्हा एप्रिल, व मे महिन्याचे साचलेले एकत्रित रिडींगची नोंद झाली व त्यानुसार सरासरी प्रमाणे दिलेले वीजबिल रिडींग वजा करून, राहिलेले वीजबिल देण्यात आले. जे मिटर रिडींगनुसार अचूक आहे. तसेच ३ महिन्याच्या स्लॅब बेनिफीट सुद्धा ग्राहकांना देण्यात आला आहे.
काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीज बिल ऑनलाईन भरले होते . परंतु काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्यांचे वीजबिल, लाॅकडाऊन मुळे कॅश कलेक्शन सेन्टर बंद असल्यामुळे भरले नाहीत , म्हणून त्यांना जून मध्ये वीजबिलाची थकबाकीची रक्कम जोडून आल्यामुळे विजबिल अजून जास्त दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. परंतु, जूनचा बिलाविषयी ग्राहकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहेत . म्हणून ग्राहकांना वरील प्रमाणे वस्तुस्तिथी समजावून सांगण्यासाठी वेबिनार, मदत कक्ष इत्यादी माध्यमाद्वारे त्यांच्या शंकाचे निरसन करण्याची व्यवस्था महावितरणने केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असुन, जून महिन्याचा बिलाचे भांडूप परिमंडलात १० लाख ५५ हजार ग्राहकांनी ३०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.