नवी मुंबई : वाशी येथे बंद घरात घरफोडीची घटना शनिवारी रात्री घडली आहे. घरातील सर्व व्यक्ती आसाम येथे गेल्याने घर बंद असताना ही घटना घडली आहे. त्यामध्ये सुमारे १० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.वाशी सेक्टर ९ येथील आशीर्वाद सोसायटीत राहणाऱ्या मुरलीकृष्ण केरू यांच्या घरी ही घटना घडली आहे. केरू यांच्या घरातील सर्वच व्यक्ती दहा दिवसांपूर्वी आसाम येथे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञाताने घरफोडी केली. केरू यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. त्यानुसार घरातील सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. चोरीला गेलेले दागिने वडिलोपार्जित असल्याचे केरू यांचे म्हणणे आहे. मुरलीकृष्ण केरू यांना दोन भाऊ असून एक कोपरी तर दुसरा खारघर येथे राहतो. त्यानुसार तिघांच्याही हिश्शाचे वडिलोपार्जित दागिने मुरलीकृष्ण यांच्या घरी ठेवलेले होते. त्यावरच अज्ञात चोरट्याने हात मारला आहे. रविवारी सकाळी केरू यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. ही बाब त्यांनी केरू यांना फोनवरून कळवली असता त्यांच्या भावाने घराची पाहणी करून पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१० लाखांच्या दागिन्यांची चोरी
By admin | Published: February 02, 2015 2:46 AM