लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोचे डबे बंगळुरू येथील बीईएमएलच्या कारखान्यात तयार होत असून, जानेवारी महिन्यात सहा डब्यांची एक मेट्रो मुंबईत दाखल झाली हाेती. साेमवारी या मेट्रोची चाचणी झाली असतानाच आता सप्टेंबर २०२१ पर्यंत १० मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होणार आहेत.
मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे हे स्वयंचलित आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मेट्राेतून प्रवास करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाईल. प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे बसविण्यात येत आहेत. यामुळे कोणीही प्रवासी किंवा वस्तू रुळांवर पडणार नाही, जेणेकरून अपघात होणार नाहीत. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाही कार्यान्वित असेल. प्रत्येक डब्यात आणि स्थानकावर आग प्रतिबंधित सुविधा आहे. प्रत्येक ट्रेन व स्थानकांमध्ये प्रवासी सूचना प्रणाली व प्रवासी माहिती सुविधा आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ दोन टप्प्यात कार्यान्वित होईल. डहाणूकर वाडी ते आरे हा २० किलोमीटरचा पहिला टप्पा सप्टेंबर २०११ मध्ये कार्यान्वित होईल. तर उर्वरित म्हणजे संपूर्ण मार्ग जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ हे दोन्ही प्रकल्प मार्च २०२० पर्यंत मार्गी लागणार होते. मात्र कोरोनामुळे प्रकल्पाला दीड वर्षांचा लेट मार्क लागला.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मुळे दरवर्षी सुमारे २ लाख ५० हजार टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होईल. म्हणजे मुंबईमधील प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. या दाेन्ही मेट्राेंमधून सुरुवातील दररोज ९ लाख प्रवासी प्रवास करतील. परिणामी पश्चिम रेल्वे मार्गासह पश्चिम द्रुतगती मार्गावर येणारा ताण कमी होईल. रिक्षा, टॅक्सी, बेस्टसह उर्वरित वाहनांवरील ताण कमी होईल.
.......................................................