लंडनवरून येणारे ‘बर्थ डे गिफ्ट’ महिलेला पडले १० लाखांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:02 AM2019-01-14T06:02:53+5:302019-01-14T06:03:03+5:30
फेसबुकवरील मैत्रीआड फसवणूक
- मनीषा म्हात्रे
मुंबई : लंडनस्थीत फेसबुक मित्राने पाठविलेल्या बर्थडे गीफ्टच्या मोहापायी शिवडीच्या एका महिलेला १० लाख रूपये गमवावे लागले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर बोरीवली पोलीस अधिक तपास करत आहे.
शिवडीतील टि. जे. रोड परिसरात राहात असलेली ३७ वर्षीय रेश्मा (नावात बदल) ही बोरीवली येथील एका इस्पीतळात परिचारीका आहे. गेल्यावर्षीच्या २० जुलैला लंडनमधील रहिवाशी ज्योयल हॅरिसन याच्याशी तिची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर नंबरची अदलाबदलही झाली. दोघांचे चॅटींग सुरु झाले. महिन्याभरानेच २० आॅगस्टला रेश्माचा वाढदिवस होता. हिच संधी साधून हॅरिसने वाढदिवसाची भेट पाठवायची आहे, असे सांगून तिच्याकडून घरचा पत्ता घेतला. मैत्री घट्ट झाल्याने तिनेही त्याला घरचा पत्ता दिला.
हॅरिससने तिला पाठवत असलेल्या महागड्या विदेशी लेडीज कॉस्मटिक्स वस्तूंचा फोटो काढून व्हॉटसअॅप केला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला. कॉलवर बोलणाºया महिलेने नवी दिल्ली येथील कस्टम आॅफीसमधून बोलत असल्याचे सांगत, लंडनमधून एक पार्सल आल्याचे तिला सांगितले.
त्या महिलेच्या सांगण्यावरुन कर म्हणून ३५ हजार रुपये तिने भरले. तिन दिवसांनी पून्हा त्या महिलेने फोन केला. करासाठी भरलेले पैसे मिळाले आहेत. परंतु पार्सल स्कॅन केल्यावर त्यात ३० हजार पाऊंड परदेशी चलन असून, त्याचा दंड म्हणून ६९ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. रेश्माने ही सुद्धा रक्कम भरली. रेश्मा आपल्या जाळ्यात अडकल्याची खात्री पटल्याने विदेशी चलन भारतीय चलनात बदलण्याच्या नावाखाली त्या महिलेने आणखी ९६ हजार रुपये उकळले.
तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमधील रक्कम शासनाने नोंदणीकृत केल्याचे सांगत आयकर म्हणून १ लाख ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. भीतीपोटी रेश्माने स्वत:चे सोन्याचे दागिने गहाण ठेऊन ही रक्कमसुद्धा भरली. त्यानंतर आळीपाळीने तिच्याकडून सुमारे १० लाख रुपये या ठगांनी उकळले. एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून रेश्माने ही रक्कम भरली होती.
फसवणुकीचा गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
आतापर्यंत १० लाख रुपये भरले असून, पार्सल मिळत नाही तोपर्यंत आणखी पैसे भरणार नाही, असे तिने त्या ठगांना खडसावले आणि कस्टम कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तिची फसवणूक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी रेश्माने बोरीवली पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.