मुंबई : उन्हाळ्याच्या झळांनी हैराण झालेल्या प्रवाशांना रेलनीरचे पाणी मिळत नसल्याचे चित्र होते, परंतु पाण्यावाचून प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी मध्य रेल्वेने खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी दिली आहे. येत्या १० जूनपर्यंत ही परवानगी असेल. त्यानंतर मात्र, रेलनीरचे पाणी प्रवाशांना मिळू शकणार आहे.
रेल्वेने परवानगी दिलेल्या खासगी कंपन्यांमध्ये ऑक्सीमोर एक्वा ,रोकोको, हेल्थ प्लस, गैलन, निंबस, ऑक्सी ब्लू, सन रिच, एल्विश, आयोनिटा या नऊ कंपन्यांचा समावेश आहे. उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थानकात आयआरसीटीसीच्या अंबरनाथमधील कारखान्यातून ‘रेलनीर’च्या बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या उन्हामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु मागणीनुसार रेलनीरचा पुरवठा करण्यात आयआरसीटीसीची दमछाक होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात रेलनीरच्या बाटलीबंद पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच स्थानकातील पाणपोई आणि पाण्याच्या व्हेंडिंग मशिन बंद असल्याने, प्रवाशांच्या त्रासात भर पडत आहे. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे.
एक लाख ७५ हजार बाटल्यांची निर्मितीरेलनीरच्या अंबरनाथ कारखान्यात दररोज एक लाख ७५ हजार बाटलीबंद पाण्याची निर्मिती होते. सीएसएमटी ते कुर्ला, एलटीटी टर्मिनस, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते कांदिवली, वांद्रे टर्मिनसपर्यंतच्या स्थानकात रेलनीरचा पुरवठा करण्यात येतो, तर उरलेल्या स्थानकात नऊ खासगी कंपन्यांचे बाटली बंद पाण्याला परवानगी दिली आहे.