लोअर परळ पुलाचे काम पूर्ण होण्यास लागणार आणखी १० महिने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 07:05 AM2019-03-23T07:05:12+5:302019-03-23T07:05:49+5:30
धोकादायक पुलाच्या यादीत असलेल्या लोअर परळ स्थानकावरील डिलाइल रोड पुलाचे पाडकाम अजून सुरू आहे. लोअर परळ पुलाच्या पूर्वेकडील भाग पाडण्यात आला असून पश्चिमेकडील भाग पाडण्यात येत आहे. त्यानंतर येथे पुलाची उभारणी केली जाईल. यासाठी आणखी १० महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. अं
मुंबई - धोकादायक पुलाच्या यादीत असलेल्या लोअर परळ स्थानकावरील डिलाइल रोड पुलाचे पाडकाम अजून सुरू आहे. लोअर परळ पुलाच्या पूर्वेकडील भाग पाडण्यात आला असून पश्चिमेकडील भाग पाडण्यात येत आहे. त्यानंतर येथे पुलाची उभारणी केली जाईल. यासाठी आणखी १० महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर ४५५ पुलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. यामध्ये लोअर परळ येथील डिलाईल रोड पूल धोकादायक असल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले. हा पूल कोणाचा व त्याची दुरुस्ती कोण करणार यावरूनही वाद रंगला होता. मात्र त्यानंतर महापालिका आणि रेल्वे यांच्या साहाय्याने या पुलाचे काम करण्याचे ठरले. त्यानुसार लोअर परळ पुलाचे काम सुरू असून १० महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण पूल उभा राहणे अपेक्षित आहे. तोपर्यंत नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागेल. लोअर परळ येथे ८५ मीटर बाय २७.५ मीटरचा स्टेनलेस स्टीलचा नवीन पूल उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाला आणखी १० महिन्यांचा कालावधी लागेल. पूल बांधण्यासाठी ८४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
वांद्रे पूर्व स्कायवॉक तीन महिने राहणार बंद
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल ते वरळी सी लिंक व परत वांद्रे-कुर्ला संकुलपर्यंत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्कायवॉकचा नंदादीप ते एस.आर.ए. इमारतीपर्यंतचा भाग २५ मार्च ते २४ जूनपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे जाहीर केले आहे. या उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका असतील. यातील वरळी सी लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुलपर्यंत येणारी मार्गिका ७८० मीटर लांब तर वांद्रे-कुर्ला संकुलापासून वरळी सी लिंकपर्यंत जाणारी मार्गिका ७२० मीटर लांब असेल.