Join us

हॉटेलच्या एका खोलीत राहतात १० परिचारिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 1:17 AM

इतर परिचरिकांनादेखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना क्वारंटाइन करून कोरोना चाचणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

मनोहर कुंभेजकर मुंबई : कुर्ला येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयातील ७० परिचारिका जवळील एका हॉटेलमध्ये राहत आहेत. विशेष म्हणजे हॉटेलच्या एका खोलीत १० परिचारिका समूहाने राहत असून एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इतर परिचरिकांनादेखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना क्वारंटाइन करून कोरोना चाचणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.याप्रकरणी येथील व्यवस्थापनाच्या रागाच्या भीतीने कोणीही परिचारिका तोंड उघडण्यास तयार नाही, अशी धक्कादायक माहिती मुंबईच्या माजी महापौर अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. कुर्ला येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयातील काही परिचारिकांचे घर खूप दूर असल्याने त्या लॉकडाउनमुळे त्या प्रवास करू शकत नाहीत.त्यामुळे त्या येथील जवळच्या हॉटेलमध्ये राहात आहेत. येथे सकाळ, दुपार व रात्रीच्या शिफ्टमध्ये त्या कार्यरत राहून येथील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. येथील हॉटेलच्या खोलीत १० जणांच्या समूहाने राहणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची  लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. इतर परिचारकांनादेखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.याकडे  अ‍ॅड़ निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष वेधले असून आपल्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन सूत्रांनी दिल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. सदर बाब आपण पालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारीडॉ. पद्मजा केसकर यांच्यादेखील कानावर घातली असून त्यांनीदेखील लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे त्या म्हणाल्या.