मुंबई : दाऊदी बोहरा समाजात पूर्वापार चालत आलेल्या ‘खतना’ (फीमेल जेनटल कटिंग) पद्धतीविषयी ‘सहियो’ या सामाजिक संस्थेने आॅनलाइन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात अवघ्या १० टक्के महिलांनी या प्रथेचे समर्थन केले आहे. ‘खतना’विषयी महिलांनी त्यांची मते मोकळेपणाने मांडली आहेत. ‘खतना’विषयी पहिल्यांदाच अशा प्रकारे चर्चा झाल्याचे ‘सहियो’चे म्हणणे आहे. ‘सहियो’ने हे सर्वेक्षण आॅनलाइन केले. त्यामुळे अजूनही इंटरनेटचा वापर न करणाऱ्या महिलांपर्यंत ही संस्था पोहोचू शकलेली नाही. तथापि, लवकरच विविध सामाजिक संस्था आणि अन्य व्यक्तींच्या माध्यमातून ‘सहियो’ दाऊदी बोहरा समाजातील महिलांशी संपर्क साधणार आहे. आॅनलाइन सर्वेक्षणात एकूण ३८५ महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांना ‘खतना’ म्हणजेच महिलांमधील सुंता या पद्धतीविषयी विचारण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी ६७ टक्के महिला या १८ ते ४५ या वयोगटातील होत्या. तर, ७६ टक्के महिलांचे लग्न झाले होते. यामधील ३१ टक्के महिला या अमेरिकेतील रहिवासी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६६ टक्के महिलांचे ‘खतना’ हे वयाच्या ६ ते ७व्या वर्षी झाले होते. खतना झालेल्यांपैकी ६७ टक्के महिलांच्या आईने खतना करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ७० टक्के महिलांचे ‘खतना’ हे देशात झाल्याची माहितीही या सर्वेक्षणातून समोर आली आहे. (प्रतिनिधी)
‘खतना’ परंपरेचे १० टक्के महिलांनी केले समर्थन
By admin | Published: August 09, 2016 2:47 AM