मोठी बातमी! खासगी, सहकारी बँकांमधील १० टक्के कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:47 PM2020-09-19T19:47:38+5:302020-09-19T20:03:13+5:30
लोकल प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी क्यूआर कोड बंधनकारक
मुंबई: खासगी आणि सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारनं विनंती केल्यानंतर रेल्वे बोर्डानं त्याला मंजुरी दिली. मात्र १० टक्के कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येईल. पश्चिम आणि मध्य रेल्वेनं यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे. त्यामुळे खासगी आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लोकलनं प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड बंधनकारक असेल. प्रत्येक बँकेतील केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येईल. याबद्दलचा निर्णय बँकांवर अवलंबून असेल.
खासगी आणि सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. राज्य सरकारकडून सूचना येईपर्यंत अशा प्रकारची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं होतं. अखेर राज्य सरकारनं रेल्वेला याबद्दल विनंती केली. सरकारची विनंती रेल्वेनं मान्य केली. त्यामुळे आता खासगी आणि सहकारी बँकांच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासी करता येईल. हे १० टक्के कर्मचारी ठरवण्याचा अधिकार बँकांना असेल. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांना रस्ते मार्गांनीच प्रवास करावा लागेल. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड बंधनकारक असेल.
सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्क सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु तरीही रेल्वेच्या डब्यांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेनं २१ सप्टेंबरपासून लोकलच्या फेऱ्या वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या ३५० फेऱ्या सुरू आहेत. परंतु आता त्या वाढवून ५०० इतक्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून रेल्वेच्या ५०० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गर्दीचं प्रमाणही थोडं कमी होण्यास मदत मिळणार असून अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
“२१ सप्टेंबरपासून सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या ३५० वरून ५०० करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालनं करावं आणि मास्क परिधान करावं,” असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.