मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात गेल्या वर्षी पेक्षा १० टक्के वाढ
By धीरज परब | Published: October 12, 2022 08:31 PM2022-10-12T20:31:31+5:302022-10-12T20:32:24+5:30
कामगार संघटनांनी केली होती मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत झालेल्या बैठकीत दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के वाढ करून दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त ढोले यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या कर्मचारी - अधिकाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्या बाबत आढावा बुधवार १२ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व रवी पवार, प्रभारी मुख्य लेखापरीक्षक मंजिरी डिमेलो, मुख्य लेखाधिकारी अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गेल्या २ वर्षांच्या कोरोना संसर्ग काळात दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ केली नव्हती. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ व्हावी अशी मागणी कामगार संघटनांनी चालवली होती. बैठकीत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी गेल्या वर्षा पेक्षा १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असे आयुक्त यांनी म्हटले आहे .
गेल्या वर्षी नगरसेवकांनी २०२० सालात दिलेल्या रकमे इतकेच सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव केल्याने कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती . गेल्या वर्षी महापालिका आस्थापनेवर असलेल्या स्थायी कर्मचारी व अधिकाऱ्यांना २२ हजार ४७० रूपये, अस्थायी संगणक चालकांना १७ हजार ३०० रूपये, बालवाडी शिक्षिका (ठोक मानधनावरील कर्मचारी) यांना ९ हजार ८८७ रूपये व वैद्यकीय आरोग्य विभागातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना १४ हजार २५२ रुपये, सर्वशिक्षा अभियन अंतर्गत काळजीवाहक कर्मचाऱ्यांना ६ जाहीर १७९ रूपये, सेवानिवृत्त लेखापरिक्षण अधिकाऱ्यांना २२ हजार ४५० रूपये, वैद्यकीय विभागातील क्षयरोग कर्मचाऱ्यांना १४ हजार २०० रूपये, प्राथमिक शाळेतील शिक्षकांना १९ हजार ७०० रूपये आणि सर्वशिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी तथा शालेय पोषण आहार अंतर्गत कर्मचारी यांना १७ हजार ३०० रूपये इतके सानुग्रह दिवाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . यंदा त्या रकमेवर १० टक्के वाढ पालिका आयुक्तांनी मंजूर केली आहे .