ख्रिश्चन समाजाला १० टक्के आरक्षण द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:27 AM2018-08-06T05:27:07+5:302018-08-06T09:53:02+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीचा वाद वाढलेला असताना, ख्रिश्चन समाजानेही १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीचा वाद वाढलेला असताना, ख्रिश्चन समाजानेही १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. शब्बार्थ पार्टी या पक्षाने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ख्रिश्चन समाजातील ट्रस्टमधील मालमत्ता वाचविण्यासाठी मालमत्ता संरक्षण कायदा करावा व ही मालमत्ता वाचवावी, धर्मगुरूंनी दिलेल्या बाप्तिस्ता प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र द्यावे, विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती द्यावी, प्रत्येक गावात कब्रस्तान द्यावे, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाची स्थापना करावी, अशा मागण्या पक्षाने केल्या आहेत. याबाबत लवकरच कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे मार्गदर्शक एस.जे.साबळे, राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. रोहम आरसुड, सरचिटणीस अॅड किशोर पाष्टे यांनी दिला आहे.
>काय आहेत मागण्या?
सर्व ख्रिस्ती ट्रस्टवर प्रशासक नेमून मालमत्तेची देखरेख करावी, ख्रिस्ती समाजाच्या २०० वर्षे पूर्ण झालेल्या वास्तंूना व संस्थांना ऐतिहासिक दर्जा द्यावा आणि त्यांना आर्थिक मदत करावी, तरुणांना उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, ख्रिस्ती धर्मगुरूंना सरकारी मानधन द्यावे, चर्च, नन्स, फादर, व ख्रिस्ती संस्थांवर होणारे हल्ले रोखावेत, साहित्यिकांना मानधन द्यावे, ख्रिस्ती समाजाला मागासवर्गीय प्रमाणपत्र देताना ५० वर्षांपूर्वींच्या वास्तव्याची अट रद्द करावी, अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.