मुंबईत १३ दिवस १० टक्के पाणी कपात; ठाणे , भिवंडीलाही कपातीची झळ

By जयंत होवाळ | Published: November 16, 2023 08:00 PM2023-11-16T20:00:20+5:302023-11-16T20:00:37+5:30

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

10 percent water cut in Mumbai for 13 days Thane, Bhiwandi also hit by cuts | मुंबईत १३ दिवस १० टक्के पाणी कपात; ठाणे , भिवंडीलाही कपातीची झळ

मुंबईत १३ दिवस १० टक्के पाणी कपात; ठाणे , भिवंडीलाही कपातीची झळ

मुंबई : या महिन्यात आणि पुढील महिन्यात मिळून मुंबईकरांना १३ दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील यंत्रणेत काही दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. मुंबईसह ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या पाणी पुरवठ्यातही १० टक्के पाणी कपात लागू असेल.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा करण्याआधी जल शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. पाण्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्यानंतरच पालिकेकडून मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेची वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीही पालिकेला करावी लागते. याच कामाचा एक भाग म्हणून पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईला होणार्‍या ३८५० दशलक्ष लिटर पाण्याव्यतिरिक्त १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी पालिकेला देण्यात येते. यामध्ये भातसामधून १०० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी आणि ५० दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे या पाणीपुरवठ्यावरदेखील परिणाम होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे, भिवंडीला होणार्‍या पाणीपुरवठ्यामध्येही १० टक्के कपात लागू करण्यात येणार आहे.
 

Web Title: 10 percent water cut in Mumbai for 13 days Thane, Bhiwandi also hit by cuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.