मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत १० टक्के पाणी कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:53 AM2023-11-17T10:53:13+5:302023-11-17T10:53:19+5:30
येत्या १३ दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मुंबई- येत्या १३ दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील यंत्रणेत काही दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याने २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे.
पालिका प्रशासनाकडून आवाहन
याच कामाचा एक भाग म्हणून पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही पाणी कपात करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाणे, भिवंडीलाही झळ
मुंबईला होणाऱ्या ३८५० दशलक्ष लिटर पाण्याव्यतिरिक्त १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी पालिकेला देण्यात येते. यामध्ये भातसामधून १०० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी आणि ५० दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे, भिवंडीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही १० टक्के कपात लागू करण्यात येणार आहे.
३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून दररोज करण्यात येतो.