१० वैमानिक पडले एकाच वेळी आजारी! ‘विस्तारा’ला करावी लागली १० विमाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:33 PM2024-03-07T13:33:39+5:302024-03-07T13:33:54+5:30
या दहाही विमानांच्या वैमानिकांनी अचानक ते आजारी असल्याचे कारण सांगत सुटी घेतल्याने ही विमाने रद्द झाली आहेत. याचा मोठा फटका या विमानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.
मुंबई : विस्तारा कंपनीच्या विमानांच्या उड्डाणाला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रद्द होण्याचे व विलंब होण्याचे ग्रहण लागले आहे. बुधवारी मुंबई व दिल्ली येथून उड्डाण करणारी १० विमाने एकाच वेळेस रद्द झाली व या रद्द होण्यामागचे कारणही मोठे विचित्र ठरले आहे. या दहाही विमानांच्या वैमानिकांनी अचानक ते आजारी असल्याचे कारण सांगत सुटी घेतल्याने ही विमाने रद्द झाली आहेत. याचा मोठा फटका या विमानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.
पर्यायी वैमानिकांची व्यवस्था करून विमानांचे उड्डाण करण्यास मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. अशा पद्धतीने वैमानिक आजारी पडण्यामागे विमान क्षेत्रात वेगळीच चर्चा सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, विस्तारा कंपनी ही एअर इंडिया कंपनीमध्ये विलीन होणार आहे. त्याची प्रक्रिया देखील जोमाने सुरू आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अलीकडेच विस्तारा कंपनीच्या वैमानिकांना उड्डाणासंदर्भात व वेतनासंदर्भात एअर इंडियाच्या वैमानिकांचेच नियम लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले. ही बाब विस्तारा कंपनीच्या वैमानिकांना मान्य नाही. यामध्येच त्यांच्या अचानक आजारी पडत कंपनीसमोर समस्या उभ्या करण्याचे गुपित दडले असल्याचे बोलले जात आहे.