शासकीय अध्यापक विद्यालयातील १० सराव पाठशाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:11 PM2020-09-16T16:11:29+5:302020-09-16T16:13:49+5:30
२ शाळा कायमस्वरूपी बंद तर ८ शाळा समायोजित करण्याचा निर्णय
मुंबई : सद्यस्थितीत अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. काहींतील विद्यार्थी संख्या तर शून्यावर गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सराव पाठ घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या १० शासकीय सराव पाठशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शासकीय अध्यापक विद्यालयातील उर्वरित विद्यार्थ्यांकरिता नजीकच्या परिसरात उपलब्ध असणारी प्राथमिक शिक्षणाची सोय विचारात घेऊन सराव पाठशाळा बंद करण्याची बाब विचाराधीन होती. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. तो मंजूर झाला आहे. पुणे येथील लोणी काळभोरमधील शासकीय अध्यापक सराव पाठशाळा, अमरावतीतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न असलेली पाठशाळा अशा दोन्ही पाठशाळा विद्यार्थी संख्या नसल्याने तातडीने बंद करण्यात येणार आहेत. या पाठशाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ३० नोव्हेंबरपूर्वी अनुक्रम समकक्ष रिक्त पदांवर समायोजन करण्यात येणार आहे.
शिक्षक, कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांवर समायोजन
उर्वरित आठ पाठशाळांमधील विद्यार्थ्यांचे समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून नजीकच्या शाळेत करण्यात येणार आहे. यात पुणे येथील भवानी पेठ, मोदीखाना, अमरावतीतील वलगाव रोड, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा या ठिकाणच्या सराव पाठशाळांचा त्यात समावेश आहे. या पाठशाळांमधील शिक्षक, कर्मचारी यांचे समायोजनही रिक्त पदांवर नंतर करण्यात येणार आहे. या समायोजनाचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी संतोष ममदापुरे यांनी आदेश काढले आहेत.