'मातोश्री'वरील कालच्या बैठकीत बंडखोर १० आमदारही सहभागी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 11:13 AM2022-06-25T11:13:46+5:302022-06-25T11:15:01+5:30
एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाचं निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेत मोठा गहजब झालेला असतानाच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई-
एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाचं निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेत मोठा गहजब झालेला असतानाच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. सध्या राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर पुढील निर्णय आणि रणनिती ठरविण्यासाठी काल रात्री 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत गुवाहटीत असलेले १० आमदार देखील फोनवरुन संपर्कात होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
"शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. कोणत्याही पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी फार महत्वाची असते. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले जातील. तसंच जे स्वत:ला वाघ म्हणवून घेत आहेत ते बकरीसारखे का वागत आहेत? हिंमत असेल तर मुंबईत या आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवा. हे आमचं तुम्हाला आव्हान आहे. आमदार जेव्हा मुंबईत येतील तेव्हा खरा खेळ लक्षात येईल", असं संजय राऊत म्हणाले.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. काल 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यात पुढील रणनिती ठरविण्यात आली आणि महत्वाची बाब म्हणजे या बैठकीवेळी गुवाहटीत असलेले १० आमदार देखील फोनवरुन संपर्कात होते. त्यामुळे आज जे गुवाहटीतून बंडाळी करत आहेत. त्यांनी इथं येऊन बोलावं", असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांनी आमच्या झमेल्यात पडू नये
देवेंद्र फडणवीसांच्या सध्या सुरू असलेल्या दिल्ली दौऱ्यावरुनही संजय राऊत यांनी फडणवीसांना सल्ला देऊ केला. "देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत. मी त्यांना एकच सल्ला देईन तुम्ही आमच्या झमेल्यात पडू नका. नाहीतर पुन्हा एकदा फसाल. याआधी पहाटेच्या शपथविधीनं तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचला आहे. आता पुन्हा एकदा तसं झालं तर तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. आमचे राजकीय मतभेद असले तरी फडणवीस आमचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिष्ठा सांभाळावी. कारण आमच्या झमेल्यात पडलात तर फसाल", असं संजय राऊत म्हणाले.
बंडखोरांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही
गुवाहाटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी तसं एक पत्रच ट्विट करत आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असं रोखठोक मत व्यक्त केलं. "बंडखोरी करुन राज्यातून पळून गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही", असं संजय राऊत म्हणाले.