मुंबई - मुंबईत वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेता, मुंबई वाहतूक पोलिसांनीही कठोर पावले उचलत कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात विशेष मोहीम राबवून ११ हजार ६३६ वाहनांवर कारवाई करत १० हजार २७३ सायलेन्सर, हॉर्न जप्त केले.
शुक्रवारी वरळी पोलिस मैदानात या जप्त केलेल्या सायलेन्सरवर रोलर फिरवून ते एकाच वेळी नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
...तर निर्माते आणि विक्रेत्यांवरही कारवाईमुंबई वाहतूक विभागामार्फत ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. मोटर वाहन उत्पादक कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या मोटरसायकल सायलेन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध बदल करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे कायद्याने विहित केल्याप्रमाणे वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण तपासणी करावी. यापुढे असे बदल करून देणाऱ्या सायलेन्सर व प्रेशर हॉर्न निर्माते, वितरक आणि विक्रेते यांच्यावरही मुंबई वाहतूक विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. - अनिल कुंभारे, सहपोलिस आयुक्त, वाहतूक
या दरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ठ, प्रभारी पोलिस निरीक्षक तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या इतर पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.