लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शहर, उपनगरात बुधवारी १० हजार ४२८ रुग्ण आणि २३ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख २८ हजार ७६० झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ८५१ आहे. सध्या मुंबईत ८१ हजार ८८६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८० टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३५ दिवसांवर आला आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.९१ टक्के झाला आहे. तर दिवसभरात ६ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३ लाख ८८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहर उपनगरात बुधवारी ५१ हजार २६३ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ४४ लाख ५ हजार २३८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्स ७२ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ७८९ इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३५ हजार ८४० अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.
* सात दिवसांत ६२ हजारांहून अधिक रुग्ण
७ एप्रिल१०,४२८
६ एप्रिल१०,०३०
५ एप्रिल ९,८५७
४ एप्रिल ५,२६३
३ एप्रिल ९,०९०
२ एप्रिल ८,८३२
१ एप्रिल ८,६४६
एकूण - ६२,१४६