६० हजार झोपड्यांत १० हजार कोटी रुपये! धारावी नेमकी कशी आहे?
By मनोज गडनीस | Published: January 22, 2023 06:01 AM2023-01-22T06:01:44+5:302023-01-22T06:01:57+5:30
१० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला मुंबईतला धारावी हा विभाग म्हणजे एक जिल्हाच जणू.
१० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला मुंबईतला धारावी हा विभाग म्हणजे एक जिल्हाच जणू. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी जरी धारावीची पूर्वापार ओळख असली, तरी जवळपास २० हजार कुटीर, सूक्ष्म, लघु उद्योगांचे देशातील सर्वात मोठे केंद्र असलेला धारावी विभाग आता १० हजार कोटींचा ब्रँड धारावी म्हणून आपली ओळख निर्माण करू पाहात आहे. धारावीमध्ये काय होते किंबहुना धारावीत काय होत नाही, असा प्रश्न करणे अधिक संयुक्तिक ठरेल.
देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून येऊन लोकांनी इथे आपली चूल मांडली आहे. पण ही चूल मांडताना ते सोबत घेऊन आले ते त्यांचे प्रांतिक कौशल्य आणि या कौशल्यातूनच त्यांनी येथे विविध वस्तूंच्या निर्मितीचे छोटेखानी कारखानेच तयार केले आहेत. धारावीमध्ये ६० हजारांच्या आसपास झोपड्या आहेत. यातून २० हजार लहान-मोठे कारखाने कार्यरत आहेत. इथे टॅक्सी ड्रायव्हर, घरकाम करणारे लोक, कचरा वेचणारे लोक यांच्यापासून कुटीर उद्योग करणाऱ्या असंख्य कारागीरांचे वास्तव्य आहे. त्यांचे दुकान आणि मकान दोन्ही तिथेच आहे.
ब्रँड धारावी...
धारावीतील कारखाने आणि तिथे उत्पादित होणारे सामान याबद्दल एक वदंता आहे, ती म्हणजे, ब्रँडेड उत्पादनांची विक्री करणाऱ्या अनेक नामांकित कंपन्या आपली उत्पादने धारावीतून उत्पादित करून घेतात. मग शर्ट, टी-शर्ट, जीन्स, बूट किंवा धारावीच्या प्रसिद्ध लेदर बॅग्ज, येथील निर्मात्यांकडून त्या बनवून घ्यायच्या आणि बँडचा शिक्का मारुन त्या खुल्या बाजारात विकायच्या.
धारावी कशी आहे?
२.५ चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण क्षेत्रात धारावी पसरली आहे.
कशाचे उत्पादन होते ?
धारावी म्हटलं की, लोकांच्या डोळ्यासमोर केवळ तिथले लेदर मार्केट येते. पण लेदर वस्तूंची निर्मिती हा धारावीच्या एकूण टर्नओव्हरमधला केवळ एक भाग आहे. त्याच्यापलीकडे अनेक उद्योग इथे पाय रोवून उभे आहेत. लग्नासाठी अलीकडच्या काळात फॅशन झालेल्या चार पदरी केकपासून, कुंभारपाड्यात बनणारे माठ, कुंड्या, मातीच्या वस्तू किंवा विविध प्रकारच्या रेग्झिन किंवा फायबरच्या बॅग्स, सुतारकामातून साकारले जाणारे आकर्षक लाकडी फर्निचर, विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे (अगदी कोविंड काळात पीपीई किटदेखील इथेच तयार झाले), बूट, वेल्डिंग, फॅब्रिकेशन असे किमान २०० पेक्षा जास्त उद्योग इथे आहेत.
अडीच लाख रोजगार
धारावीत असलेल्या अनेक उद्योगांना कुशल कामगारांची गरज भासते. त्यामुळे धारावी हे लाखो लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख ठिकाण आहे. उपलब्ध माहितीनुसार, धारावीचे रहिवासी नसलेले पण तिथे रोजगारासाठी येणारे असे किमान अडीच लाख लोक आहेत.