Join us  

१० हजार कोटींचा पाणीघोटाळा?, मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीची सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 8:05 AM

शेलार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर अतुल भातखळकर, योेगेश सागर, सुनील राणे, वर्षा गायकवाड, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर यांनीही चर्चेत भाग घेतला.   

मुंबई : टँकरद्वारे पाणीवाटपातमुंबई शहरामध्ये दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा गेल्या काळात झाल्याचा आरोप भाजपचे सदस्य आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्यानंतर या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.   शेलार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर अतुल भातखळकर, योेगेश सागर, सुनील राणे, वर्षा गायकवाड, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर यांनीही चर्चेत भाग घेतला.   मुंबईत गळतीमुळे ३० टक्के म्हणजे ५०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते ते वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणार का? मुंबईत १९  हजार विहिरी असून त्यामध्ये १२५०० बोअरवेल आहेत. केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, एका बोअरवेलमधून ८० कोटीची चोरी टँकरमधून होते. याचा अर्थ मुंबईत १० हजार कोटींचा पाण्याचा घोटाळा टँकरमार्फत केला जातो. याची चौकशी करणार का? असा प्रश्न शेलार यांनी केला.  त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी टँकर पाणी चोरीची चौकशी केली जाईल, पाणी वाया जाते त्याबद्दल सर्वंकष विचार केला जाईल, तर वांद्रे पश्चिम मधील पाण्याचे वेळापत्रक बदलण्याची सूचना पालिकेला केली जाईल, असे सांगितले. मुंबईतील आमदारांनी पाण्याबाबत विविध तक्रारी केल्या त्यामुळे याबाबत एक बैठक घेऊ, असे मंत्र्यांनी आश्वस्त केले. मुंबईचा पुढील २५ वर्षांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी गारगाई धरण उभारण्याची मागणी भातखळकर यांनी केली. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. 

मुंबईकरांना मोफत पाणी द्यादिल्लीप्रमाणे सामान्य मुंबईकरांना मोफत पाणी देण्याची मागणी भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी केली. या बाबत अभ्यासगट स्थापन करण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

समान पाणीवाटपाचा अहवाल सार्वजनिक करणार      मुंबईकरांना जेवढे पाणी रोज पुरविले जाते ते बघता दरव्यक्ती ३०० लिटर पाणी मिळायला हवे, पण वाटपातील भेदभावामुळे तसे होत नाही.      समान पाणीवाटप करण्यासाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल सार्वजनिक करा अशी मागणी भाजपचे योगेश सागर यांनी केली. तसे निर्देश मुंबई महापालिकेला दिले जातील, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :मुंबईपाणी