मुंबई : महापालिकेने सादर केलेल्या विकास आराखड्याबाबत आजवर तब्बल १० हजार सूचना प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेचे सल्लागार विद्याधर फाटक यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे त्याहून अधिक सूचना येण्याची शक्यता असून, नियम का बनविलेले आहेत हे समजून न घेता सर्वांत जास्त हरकती अथवा सूचना आल्या आहेत, असेही फाटक यांनी नमूद केले.‘प्रारूप विकास आराखडा २०३४’बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साकीनाका येथे लायन्स क्लब आॅफ लोखंडवाला गॅलेक्सी, महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित परिसंवादात फाटक म्हणाले, विकास आराखडा २०३४ मुंबईच्या विकासासाठी आहे हे लोकांनी समजून घ्यावे, अशी आमची इच्छा आहे. मुंबईची लोकसंख्या नियंत्रित करता येईल आणि चटईक्षेत्र निर्देशांक मर्यादित करता येईल या गृहीतकावर आधीचा विकास आराखडा आधारलेला होता. मात्र प्रारूप विकास आराखडा २०३४ कोणत्याही गृहीतकावर आधारलेला नाही. जर चटईक्षेत्र निर्देशांक नियंत्रित केला तर मुंबईच्या लोकसंख्येला घरे कशी उपलब्ध होतील. त्यामुळे आम्ही नियोजन आणि चटईक्षेत्र निर्देशांकाचे गणित सोपे केले आहे. चटईक्षेत्र निर्देशांकाच्या गणितातील सर्व सूट काढून टाकली आहे आणि टीडीआर सोपा करण्यात आला आहे.माजी अभियंते सुधीर घाटे म्हणाले, कोणत्याही इमारतीच्या, योजना, विकास आणि पाडून टाकण्यासाठीच्या परवानग्या या इमारत प्रस्ताव विभागाकडेच ठेवल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे नावाचे हस्तांतरण करण्याची जबाबदारीही महापालिकेकडेच असली पाहिजे. अॅड. अमित मेहता म्हणाले, रेल्वे स्थानकांच्या परिसरात अधिक चटईक्षेत्र निर्देशांकांचा (एफएसआय) प्रस्ताव आहे. मात्र प्रत्येक स्थानकानुरूप व्यावहारिक दृष्टिकोनातून याचा विचार व्हावा.