सुरेश लोखंडे ल्ल ठाणेपावसाळा संपल्यानंतर हवेतील गारवा कायम राहून सुरू असलेल्या हिवाळ्याची तीव्रता कमी होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोरडवाहू शेतांसह रानावनांत सर्पासह विंचू आणि गावपाड्यांमध्ये श्वानदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यानुसार, जिल्ह्यातील सुमारे १० हजार ८८ जणांना वर्षभरात या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. यात एकाचाही मृत्यू झालेला नसल्याची हास्यस्पद नोंद आरोग्य यंत्रणेकडे पाहायला मिळाली आहे. सर्प, विंचू आणि श्वानच्या या १० हजार ८८ घटनांमध्ये सर्पदंश झालेल्या एक हजार ६३ जणांचा समावेश आहे. यातील ५५ जणांना महिनाभरात या सर्पदंश तर तीन हजार ७२२ जणांना विंचूदंश झाला आहे़ यातील १५० जणांना मागील महिन्यात विंचू चावला आहे. याशिवाय, सहा हजार २९८ गावकरी, शेतकरी आणि छोट्या मुलामुलींचे श्वानांनी लचके तोडले आहेत. यातील ५५६ जणांना मागील महिन्यात श्वानदंशाच्या जीवघेण्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. मात्र, रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंदे्र व उपकेंद्रांमध्ये सर्प, विंचू आणि श्वानदंश प्रतिबंधक लस उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले. यामुळे या घटनांमधील एकही रुग्ण दगावलेला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी केला.वर्षभरात सर्पदंशाच्या घडलेल्या एक हजार ६८ घटनांमध्ये एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा लोकमतच्या पाहणीअंती फोल ठरला आहे. पाच महिन्यांपूर्वी म्हणजे आॅगस्टमध्ये शहापूर तालुक्यातील बाबरवाडी या आदिवासीपाड्यामधील करण या चार वर्षांच्या मुलासह त्याच्या चार महिन्यांच्या बहिणीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेचा आरोग्य यंत्रणेला विसर पडल्यामुळे सर्पदंशाच्या त्यांच्या मृत्यूची नोंद अद्यापही आरोग्य विभागाने घेतली नाही. त्याप्रमाणेच भिवंडी तालुक्यातील खोणी परिसरातील दोन भावांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला असून लोनाडजवळील खंबाळे गावात एक जण सर्पदंशाने दगावलेला आहे. पण सर्प, विंचू, श्वानदंशाच्या अहवालात या मृत्यूची नोंद आढळून येत नसल्याने आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे़
जिल्ह्यात १० हजार जणांना सर्प-विंचू-श्वानदंश!
By admin | Published: February 28, 2015 11:03 PM