सिग्नल तोडून पुढे गेलेल्या मुंबई सेंट्रल-लखनऊ सुविधा एक्स्प्रेसला ढकलणा-या कर्मचा-यांना १० हजारांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:43 AM2017-10-23T06:43:05+5:302017-10-23T06:43:07+5:30
मुंबई : सिग्नल तोडून पुढे गेलेल्या मुंबई सेंट्रल-लखनऊ सुविधा एक्स्प्रेसला ढकलणा-या ४० रेल्वे कर्मचा-यांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने एकूण १० हजारांचे सामूहिक बक्षीस जाहीर केले आहे. एक्स्प्रेस हाताने ढकलून फलाटावर आणण्याची ही घटना रेल्वे इतिहासात पहिल्यांदा घडली आहे.
मुंबई : सिग्नल तोडून पुढे गेलेल्या मुंबई सेंट्रल-लखनऊ सुविधा एक्स्प्रेसला ढकलणा-या ४० रेल्वे कर्मचा-यांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने एकूण १० हजारांचे सामूहिक बक्षीस जाहीर केले आहे. एक्स्प्रेस हाताने ढकलून फलाटावर आणण्याची ही घटना रेल्वे इतिहासात पहिल्यांदा घडली आहे. दरम्यान, सिग्नल तोडून एक्स्प्रेस पुढे नेणाºया लोकोपायलटचे निलंबन करण्यात आले असून त्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
सुविधा एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल फलाट क्रमांक २ वरून गुरुवारी रात्री ७.४५ वाजता रवाना झाली. मात्र सिग्नल बदलासाठी न थांबता लोकोपायलटने थेट एक्स्प्रेस पुढे नेली. यामुळे विरार दिशेकडील रुळावर एक्स्प्रेसचे सात डबे गेले. हा डेड-एंड असल्यामुळे येथे ओव्हरहेड यंत्रणा नव्हती. परिणामी इंजीन सुरू करण्यासाठी ओएचईमधून विद्युत प्रवाह मिळाला नाही. या प्रकारामुळे उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसवर देखील परिणाम झाला. विरार दिशेकडे डेड-एंड असल्यामुळे पर्यायी इंजीन पाठवणेही शक्य नव्हते. अखेर रेल्वे कर्मचारी हमाल आणि अन्य सहकारी अशा ४० जणांनी एक्स्प्रेसला धक्का मारून ही एक्स्प्रेस पुन्हा फलाटावर आणण्यात आली.
डेड-एंड असल्यामुळे पर्यायी इंजीन नेता आले नाही. या वेळी गाडीत प्रवासी नव्हते. डेड-एंड असल्यामुळे अपघात होण्याची भीती टळली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी दिली.