Join us

मुंबईत उद्यापासून १०% पाणीकपात, तलावांमध्ये ८५ टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:12 AM

मुंबई पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा मोठा दिलासा मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मिळणार आहे.

मुंबई : मुसळधार पावसाने १५ दिवसांतच पाण्याचे टेन्शन मिटवले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये बुधवारपर्यंत ८५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे सध्या २० टक्के असलेली पाणीकपात कमी करून २१ आॅगस्टपासून १० टक्के करण्यात येणार आहे. मुंबई पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा मोठा दिलासा मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मिळणार आहे.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलावांमध्ये अवघा ३४ टक्के जलसाठा होता. मान्सूनचे दोन महिने कोरडे गेल्यामुळे मुंबईत पाणीप्रश्न बिकट होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू केली.५ आॅगस्टपासून सतत पाऊस बरसत असल्याने तलाव क्षेत्रात जलसाठा वाढत राहिला. अवघ्या १५ दिवसांत तलाव क्षेत्रात एकूण ४८ टक्के जलसाठा वाढला आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आता केवळ १५ टक्के जलसाठा कमी आहे.>मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पाणीसाठ्याचा आढावा घेऊन २० टक्के असलेली पाणीकपात कमी करण्याचा निर्णय घेतला. आता २१ आॅगस्टपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात होईल. आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर हे तलाव भरून वाहत आहेत.>तलावातील पाण्याच्या पातळीतील आता झालेली वाढ सुखद असली तरी आॅगस्ट २०१८ मध्ये91.83%तर आॅगस्ट २०१९ मध्ये94.28%इतका जलसाठा होता.