नवी मुंबई : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरात १० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी परिमंडळ-१ च्या पोलिसांनी चार तर गुन्हे शाखेने सहा शस्त्रे जप्त केली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी या कारवाया केल्या आहेत.शहरात सुरू असलेल्या निवडणुकी दरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. अनेक उमेदवारांमध्ये वाद असून त्यापैकी काहींना गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे. यादरम्यान राजकीय वादाला गुन्हेगारी वळण लागू नये म्हणून पोलिसांनी बेकायदा शस्त्रांवर कारवाया करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आचारसंहिताकाळात १० बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी ४ शस्त्रे परिमंडळ-१ च्या पोलिसांनी तर ६ शस्त्रे गुन्हे शाखेने जप्त केली आहेत. या आधीच्या महापालिका निवडणुकीत शहरातून अवघे एक शस्त्र जप्त करण्यात आले होते.ऐरोली येथील पटनी मैदानालगत एक गुन्हेगार येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या पथकाने तेथे सापळा रचला होता. यावेळी विनायक मेनवेल (५५) याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन गावठी कट्टे व दोन काडतुसे आढळली. अधिक चौकशीत त्याने ही शस्त्रे मध्य प्रदेशच्या दिनेशसिंग परिहार याच्याकडून आणली असल्याचे सांगितले. त्याने नवी मुंबईत विक्रीसाठी ही शस्त्रे पाठवली होती. त्यानुसार मेनवेल याला अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्याने यापूर्वीही अनेकांना विनापरवाना बेकायदा शस्त्रांची विक्री केल्याची शक्यता आहे. त्याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे युनिट-२ च्या गुन्हे शाखेने पेंधर फाटा येथून एकाला अटक केली आहे. शाहरुख शेख (२२) असे त्याचे नाव असून तो मुंब्य्राचा रहिवासी आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व १ विदेशी पिस्तूल तसेच तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर यापूर्वीही ठाणे, मुंब्रा व इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले. या बेकायदा शस्त्रांचा निवडणुकीशी संबंध असल्याची दाट शक्यता आहे. सध्या शहरात निवडणुकीचे वातावरण रंगत असल्याने अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये वादाचे प्रकारही घडत आहेत. त्यामध्ये अशा बेकायदा शस्त्रांचा वापर देखील होण्याची दाट शक्यता होती. (प्रतिनिधी)
निवडणूक काळात १० शस्त्रे जप्त
By admin | Published: April 22, 2015 3:29 AM