Join us

१० वर्षांचा चिमुकला ब्रेनडेड, पालकांनी केले अवयव दान; समाजासाठी कौतुकास्पद निर्णय

By स्नेहा मोरे | Published: January 31, 2024 7:25 PM

यकृत , दोन मूत्रपिंड आणि कॉर्नियाचे दान, सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षीय मुलाला खेळल्यानंतर अचानक तीव्र डोकेदुखी जाणवू लागली.

 मुंबई - सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षाच्या मुलाला पालकांनी अवयवदानाचा निर्णय हा संपूर्ण समाजासाठी आदर्श निर्माण करणारा आहे. यंदा नवीन वर्षात जानेवारी २०२४ या पहिल्याच महिन्यात आतापर्यंत पाच अवयवदानांची नोंद झाली आहे, १० वर्षाच्या मुलाचे अवयवदान हे मुंबईतील नव्या वर्षातील पाचवे अवयवदान आहे, अशी माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.

सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षीय मुलाला खेळल्यानंतर अचानक तीव्र डोकेदुखी जाणवू लागली. त्यामुळे पालकांनी त्याला अनेक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले होते, मात्र काही केल्या त्याचे दुखणे कमी होत नव्हते. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने अखेरीस त्याला नानावटी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले.

त्यानंतर डॉक्टरांनी पालकांशी अवयवदानाबद्दल चर्चा केली, त्यांचे समुपदेशन केले. अखेरीस पालकांनी अवयवदान करण्यास संमती दिली. या मुलाचे एकूण चार अवयव दान करण्यात आल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे. यात यकृत , दोन मूत्रपिंड आणि कॉर्नियाचा समावेश आहे. या मुलाचे यकृत प्रतिक्षायादीतील जालना जिल्ह्यातील पाच वर्षाच्या मुलाला प्रत्यारोपित करण्यात आले आहे. हा रुग्ण दीर्घकाळापासून कावीळ ग्रस्त होता. त्याच्यावर नानावटी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. तसेच, दहा वर्षाच्या मुलाचे इतर अवयव शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी होणाऱ्या रुग्णांना दान करण्यात आले आहे. यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीला अवयवदानाचे चित्र पाहता हे वर्ष चळवळीबाबत अधिक सकारात्मक आणि जागरुकतेचे ठरेल असा विश्वासही समितीने व्यक्त केला आहे.