Join us

मोदी सरकारची १० वर्षे अमृतकाल नाही, तर विनाशकाल - सचिन पायलट

By रेश्मा शिवडेकर | Published: February 20, 2024 9:50 PM

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कामकाजाचा पाढा वाचला.

मुंबई - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात आलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार १० वर्षात सर्व आघाड्यांवर नापास झालेले आहे. १० वर्षात केवळ मुठभर लोक श्रीमंत झाले असून सर्वसामान्य जनता, मध्यमवर्ग, शेतकरी, कामगार यांचे प्रचंड हाल झाले आहेत. मोदी सरकारने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, केवळ मोठमोठ्या थापा मारल्या असून मोदींचा १० वर्षांचा काळ हा अमृतकाळ नाही तर जनतेसाठी विषकाळ ठरला आहे, असा घणाघाती हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे.

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कामकाजाचा पाढा वाचला. ते पुढे म्हणाले की,  सत्तेत येताना नरेंद्र मोदी यांनी भरमसाठ आश्वासने दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करतो, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देतो, अशी आश्वासने दिले पण ही सर्व आश्वासने हवेतच विरली. यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मोदी सरकारने आजही पाळलेला नाही. उलट त्यांना चिरडून टाकत आहे. पीक विमा कंपन्यांनी ४० हजार कोटी रुपये कमावले परंतु शेतकऱ्यांना मात्र कोणतीच मदत मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर मोदी सरकारने १०० रुपये लिटरपर्यंत वाढवले, मागील चार महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती कमी झाल्या आहेत तरीही पेट्रोल, डिझेलचे दर मात्र कमी केले नाहीत. देशावर २०५ लाख कोटी रुपयाचे कर्ज केले आहे. अर्थव्यवस्था सुधारल्याचे चित्र निर्माण केले जात आहे तर दुसरीकडे देशातील ८० कोटी लोकांना मोफक अन्नधान्य द्यावे लागत आहे हा विरोधाभास आहे, अशी घणाघाती टीका करत सचीन पायलट यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले.

विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी ईडीचा गैरवापर केला गेला. ईडीने ९५ टक्के छापे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टाकले आहेत, यातील केवळ १ टक्के प्रकरणात शिक्षा झाली आहे. भाजपाला निवडणुकीत यश मिळेल याचा आत्मविश्वास नाही. म्हणूनच विरोधी पक्षांची फोडाफोडी ते करत आहेत.-सचिन पायलट 

टॅग्स :सचिन पायलटकाँग्रेसभाजपा