१०० शेतकी कंपन्या सीबीआयच्या रडारवर; बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:12 AM2022-08-02T11:12:27+5:302022-08-02T11:12:46+5:30
पाच वर्षांतील कारवायांची आकडेवारी उघड; वर्षभरात १२ कंपन्यांचा बँकांना १,४०० कोटी रुपयांचा गंडा
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषी उत्पादित मालाच्या आयात - निर्यातीसाठी बँकांकडून कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड न करता त्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात १२ कृषी उत्पादक कंपन्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रडारवर आल्या आहेत. या कंपन्यांनी बँकांना सुमारे १,४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समजते. गेल्या पाच वर्षांत सुमारे १०० कृषी उत्पादक कंपन्यांनी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तांदूळ, डाळी, मसाले, कॉफी अशा विविध कृषी उत्पादित मालांची आयात व निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून बँकांचे कर्ज बुडविण्याचे प्रकार गेल्या पाच वर्षांपासून होताना दिसत आहेत. यातील पहिले प्रकरण सप्टेंबर, २०१७मध्ये उजेडात आले होते. मसाले आणि कॉफीच्या आयात - निर्यातीमध्ये कार्यरत असलेल्या मे. रावतेर स्पाईस कंपनीने जम्मू - काश्मीर बँकेकडून कर्ज घेतले होते. कंपनीने बँकेची ३५२ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केली. नंतर कंपनीचे कर्जखाते थकीत झाले. याखेरीज सीबीआयने कारवाई केलेल्या कंपन्यांमध्ये देशातील अनेक मोठ्या कृषी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.
श्री वसंत ऑईल कंपनीने कर्ज देणाऱ्या बँकेला १२४ कोटी रुपयांचा गंडा घातला. सौरव प्रा. लि. या कंपनीनेही बँकांचे १२६ कोटी रुपये थकवले आहेत. याचसोबत गेल्या वर्षी बँकेला ११४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने श्री जलाराम राईस कंपनीवरही कारवाई केली होती. सर्वात गाजलेली कारवाई होती शक्ती भोग आटा या कंपनीवरील. याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२१ रोजी सीबीआयने कारवाई केल्यानंतर कंपनीने १० बँकांना ३,२६९ कोटी ४२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले.
या कंपन्यांनी आपल्या मालाच्या आयात आणि निर्यातीसाठी तसेच, कंपनीच्या विस्तारासाठी बँकांकडून कर्ज घेतले.
बहुतांश प्रकरणांमध्ये कंपनीने कर्जाची नियमित परतफेड केली नाही.
यातील काही कंपन्यांनी, कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम काही बनावट कंपन्यांमध्ये वळविली आणि तिथून त्या रकमेचा वापर वैयक्तिक लाभासाठी केल्याचे सीबीआयच्या तपासात दिसून आले.
काही कंपन्यांनी कर्जापोटी मिळालेल्या रकमेतून मालमत्तांचीदेखील खरेदी केल्याचे स्पष्ट झाले.
अशा खरेदी झालेल्या मालमत्ता सीबीआयने कारवाईदरम्यान जप्त केल्या आहेत.