देशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 12:19 AM2018-11-22T00:19:25+5:302018-11-22T00:19:53+5:30
देशातील १०० श्रीमंत बिल्डर्स व बांधकाम व्यावसायिकांकडे २ लाख ३६ हजार ६१० कोटींची संपत्ती आहे. भाजपचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत पहिल्या स्थानी आहेत.
मुंबई : देशातील १०० श्रीमंत बिल्डर्स व बांधकाम व्यावसायिकांकडे २ लाख ३६ हजार ६१० कोटींची संपत्ती आहे. भाजपचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २७,१५० कोटी आहे. हुरून ही सर्वेक्षण संस्था व ग्रोहे या पाइप फिटींग व नळ क्षेत्रातील कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रातील श्रीमंतांची यादी बुधवारी जाहीर केली.
देशतील १०० श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांच्या संपत्तीत मागीलवर्षीपेक्षा २७ टक्के वाढ झाली. यांचे सरासरी वय ५९ इतके आहे. यापैकी ५९ टक्के पहिल्यांदाच या क्षेत्रात आलेले आहेत. आरएमझेड एन्टरप्राइझेस कंपनीचे २४ वर्षीय कुणाल मेंडा हे सर्वात तरुण श्रीमंत बिल्डर तर ईस्ट इंडिया हॉटेल्सचे ८९ वर्षीय पृथ्वीराज सिंग ओबेरॉय हे सर्वात वयोवृद्ध श्रीमंत व्यावसायिक आहेत. या १०० व्यावसायिकांची सरासरी संपत्ती २,३६६ कोटी आहे. १०० पैकी सर्वाधिक ३५ श्रीमंत बिल्डर्स मुंबईतील आहेत. एकूण ७८ व्यावसायिक हे मुंबई, दिल्ली व बंगळुरू या भागातील आहेत. या यादीत यंदा पहिल्यांदाच आठ महिलांचा समावेश झाला. डीएलएफ समुहाच्या रेणुका तलवार या सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आहेत.
आनंद पिरामलही
रिलायन्सचे मुकेश अंबानी यांचे होणारे जावई आनंद पिरामल या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. आनंद व त्यांचे वडील अजय यांची संयुक्त संपत्ती ६३८० कोटी रुपये असून ते या यादीत आठव्या स्थानी आहेत.
राज्यातील श्रीमंत बिल्डर्स
नाव संपत्ती(कोटींमध्ये)
मंगलप्रभात लोढा २७,१५०
चंद्रू रहेजा १४,४२०
विकास ओबेरॉय १०,९८०
निरंजन हिरानंदानी ७,८८०
सुरेंद्र हिरानंदानी ७,८८०
पिरामल कुटुंबिय ६,३८०