है तय्यार हम! मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १०० केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 09:52 PM2021-02-26T21:52:54+5:302021-02-26T21:53:31+5:30
सुमारे २५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्यांना लसीकरण मोहिमेसाठी सतर्क राहण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठी मुंबईत शंभर लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. तर सुमारे २५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्यांना लसीकरण मोहिमेसाठी सतर्क राहण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
कोरोना लसीकरणाच्या तिसर्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. तर शनिवारी राज्य सरकारबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत तिसर्या टप्प्याच्या लसीकरणाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. मात्र अद्याप नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही, तरीही पालिकेने सर्व यंत्रण सज्ज ठेवली आहे. सध्या ३० कोविड लसीकरण केंद्रे आहेत. तिसर्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. सध्या पालिकेकडे तीन लाखापर्यंत लसींचा साठा आहे.
"पालिकेकडून ही लस मोफत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क किती असेल ते केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संबंधित रुग्णालयांकडून आकारले जाईल"
- सुरेश काकाणी (अतिरिक्त आयुक्त)
कांजूरमार्गचे कोल्ड स्टोरेज केंद्र तयार....
कांजूरमार्ग येथे लस साठण्यासाठी मोठ्या क्षमतेचे कोल्ड स्टोरेज केंद्र महापालिकेने तयार केले आहे. मात्र त्याचे काम सुरू असल्याने त्याचा वापर अद्याप केला जात नव्हता. कोविड लसीकरणाच्या पुढील टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसी मुंबईत येणार आहेत. हे डोस कांजूर मार्गाच्या कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये साठवण्याची पूर्ण तयारी महापालिकेने केली आहे.