१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:57 AM2024-10-23T08:57:57+5:302024-10-23T08:59:02+5:30
जामिनाच्या अटी निश्चित करण्याचे विशेष न्यायालयाला आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयाकडून मंगळवारी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. त्याच्या जामिनाच्या अटी निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला दिले आहेत.
हा जामीन केवळ भ्रष्टाचारासंदर्भातील गुन्ह्यात देण्यात आला असून, अन्य प्रकरणांत नाही, हेही आम्ही स्पष्ट करतो, असेही न्या. एम. एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले. सचिन वाझे हा अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही आरोपी आहे.
१०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात वाझे याची जामिनावरील याचिका न्यायालयाने निकाली काढली. २१ एप्रिल २०२१ रोजी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल करतानाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
‘माफीचा साक्षीदार’ अजून तुरुंगात?
- अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटींची मागणी केली होती असा आरोप वाझे यांनी केला होता. या प्रकरणामध्ये वाझे ‘माफीचा साक्षीदार‘ झाला आहे. देशमुख यांच्यासह सर्व आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी वाझे अद्याप कारागृहात आहे.
- ‘माफीचा साक्षीदार’ असूनही कारागृहात ठेवण्यात आले असून, आपल्याला अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवू शकत नाही, असे वाझे यांनी याचिकेत म्हटले होते.
- मात्र, खटला पूर्ण होईपर्यंत कारागृहात ठेवण्याच्या सीआरपीसी तरतुदीच्या वैधतेवरील प्रश्न न्यायालयाने खुला ठेवला.