मयूर तांबडे / पनवेलतालुक्यात इमारती व चाळीमध्ये स्वस्तात घर देतो, असे सांगून बिल्डरांनी गेल्या तीन वर्षात हजारो ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. जाहिरातींना भुलून ग्राहकांनी स्वप्नातील घरासाठी आयुष्याची पुंजी लावली आहे. मात्र अनेकांना घरे मिळाली नाहीतच शिवाय पैसेही परत मिळाले नाहीत. त्यामुळे अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षात बांधकाम व्यावसायिकांवर विरोधात तब्बल ४१ गुन्हे दाखल झाले असून तब्बल २१ कोटी ७६ लाख २ हजार ८८३ रूपयांची फसवणूक झाली आहे. हे आकडे गुन्हा दाखल करतानाचे असून फसवणुकीचा आकडा १०० कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पनवेल परिसरात स्वस्त घरांचा भुलभुलैय्या दाखवून अनेकांकडून लाखो रु पये उकळून बिल्डर पसार झाले आहेत. अनेक ठिकाणी जागा एन. ए. केलेली नसताना अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी एकाच रुमचे बुकिंग चार ते पाच ग्राहकांना देण्यात आले आहे. बुकिंग घेऊन दोन ते तीन वर्ष उलटून गेली तरी बांधकामांचा पत्ता नाही. २०१३ मध्ये खांदेश्वर पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बांधकाम व्यावसायिकांवर ४१ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील नेरे, विहीघर, विचुंबे, चिपळे, भोकरपाडा, बोनशेत, शिवकर, शांतीवन, वाकडी, मोर्बे, कामोठे, सुकापूर, हरिग्राम, केवाळे, वांगणी, कोप्रोली, आदी ठिकाणी व्यावसायिकाने बैठ्या चाळी तसेच इमारतीच्या रूमची ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून जाहिरातबाजी केली होती. त्यामध्ये विमानतळ, रेल्वस्थानक, बसस्थानक जवळ असल्याचे दाखले देत ग्राहकांना भुलवले. साईट सुरु करतो असे सांगून हजारो ग्राहकांकडून कोट्यवधींची माया जमा केली. मात्र अद्यापपर्यंत साईटवर कोणत्याही प्रकारचे काम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आहेत.
बांधकाम क्षेत्रात १०० कोटींची फसवणूक
By admin | Published: October 12, 2016 4:46 AM