नववर्षात १०० कोटींची सोन्याची तस्करी, विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:28 AM2023-01-31T10:28:33+5:302023-01-31T10:29:20+5:30
Crime News: नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई विमानतळावर कस्टम विभाग आणि केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी विविध घटनांतून तब्बल १०० कोटी रुपये मूल्याच्या सोन्याची तस्करी पकडली आहे.
मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई विमानतळावर कस्टम विभाग आणि केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी विविध घटनांतून तब्बल १०० कोटी रुपये मूल्याच्या सोन्याची तस्करी पकडली आहे. अलीकडच्या काळात एका महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी पकडण्याचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत मुंबई विमानतळावर सोने तस्करीच्या घटना वाढल्याचे दिसून आले. या विविध घटनांतून एकूण २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ११ परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. साधारणपणे आतापर्यंत परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून सोन्याची तस्करी होत होती. मात्र, आता यामध्ये परदेशी नागरिक देखील सहभागी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या होणारी तस्करी ही केवळ एखाद-दोन प्रकरणांपुरती मर्यादित नाही तर यामागे एक मोठी टोळी सक्रिय असून, तस्करीचे मोठे जाळे असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. तसेच, आजवर सोन्याची बिस्किटे किंवा पावडर या माध्यमातून सोन्याची तस्करी होत होती. आता मात्र सोन्याची पेस्ट करून त्याद्वारे सोने आणण्याचे प्रमाणही वाढले आहे.
तसेच, गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचे लहान तुकडे मेणाच्या गोळ्यात भरून ते मेण शरीरात लपवून आणल्याची घटनाही उजेडात आली होती. तस्करीचे नवे प्रकार अलीकडच्या काळात उघडकीस आले आहेत. भारतामध्ये सोन्याच्या किमतीने प्रति १० ग्रॅम ५८ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यातच दिवाळीनंतर देशात लग्नसराईचा मौसम सुरू झाला आहे. लग्नाच्यावेळी सर्वात जास्त सोने खरेदी होते. या पार्श्वभूमीवर तस्करीच्या माध्यमातून आलेल्या सोन्यामुळे तस्करांना किमान १५ ते २० टक्के नफा कमावता येतो. त्यामुळे तस्करीच्या घटनांत वाढ होत असल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे म्हणणे आहे.
डीआरआयने पकडला सोन्याचा कारखाना
२४ जानेवारी रोजी या महिन्यांतील सर्वात मोठी कारवाई झाली होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी केवळ विमानतळावर सोन्याची तस्करीच पडकली नाही, तर तस्करीच्या माध्यमातून पुढे जाणारे सोने मुंबईत कुठे जाते व त्याचे काय होते, याचा पर्दाफाश केला. पावडर, पेस्ट अशा विविध माध्यमांतून येणाऱ्या सोन्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांवरच अधिकाऱ्यांनी छापेमारी करत याचा भांडाफोड केला होता.