१०० कोटी! ‘मरे’ची घसघशीत कमाई...; मध्य रेल्वेवर दहा महिन्यांत आढळले १८ लाख फुकटे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 10:21 AM2023-03-01T10:21:34+5:302023-03-01T10:21:54+5:30
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे उपनगरीय वाहतूक, मेल-एक्सप्रेस, विशेष गाड्या इत्यादींमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विनातिकीट प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे, अशा उद्घोषणांकडे कानाडोळा करून बिनधास्त फुकट प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने घसघशीत १०० कोटी रुपयांची वसुली केली आहे. गेल्या दहा महिन्यांत १८ लाख प्रवाशांकडून मध्य रेल्वेने ही कमाई केली.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे उपनगरीय वाहतूक, मेल-एक्सप्रेस, विशेष गाड्या इत्यादींमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. यासाठी तिकीट तपासनीसांची विशेष पथके स्थानकांवर तैनात असतात. एप्रिल, २०२२ ते फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १८.०८ लाख प्रवाशांना दंड आकारण्यात आला असून याद्वारे मध्य रेल्वेने १०० कोटींचा विक्रमी महसूल मिळवला आहे. यापूर्वी मुंबई विभागातील आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाई २०१९-२० मध्ये झाली होती. त्यावेळी १५.७३ लाख प्रकरणांमधून ७६.८२ कोटी महसूल मध्य रेल्वेने मिळवला होता.
टीसींची विशेष कामगिरी
एस नैनानी : एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १७,१२८ फुकट्यांकडून दीड कोटी रुपयांची कमाई करून दिली.
भीम रेड्डी : १०,४०९ प्रकरणांमधून ९६.३५ लाख रुपयांचे
उत्पन्न मध्य रेल्वेला मिळवून दिले.
तेजस्विनी पथकही जोशात
विशेष तेजस्विनी पथकातील तिकीट तपासनीस सुधा डी. यांनी ६,१८२ प्रकरणांमधून २०.१५ लाख रुपये तर नम्रता एस. यांनी ४,२९३ प्रकरणांमधून १९.८८ लाख रुपयांची कमाई रेल्वे प्रशासनाला मिळवून देण्यास मोलाचे सहकार्य केले आहे.