मुंबई - अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, बुधवारी रात्री 9:30 च्या सुमारास तानाजी चित्रपट राज्यात करमुक्त होणार आहे, याबाबत लवकरच घोषणा होईल, असे सांगितले होते. अद्याप कुठलिही घोषणा झाली नाही.
Breaking : अखेर महाराष्ट्रात 'तानाजी' टॅक्स फ्री, लवकरच अधिकृत घोषणा
फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तानाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे, असे म्हटले होते. त्यानंतर, तानाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार असल्याच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन तानाजी चित्रपटाबद्दल महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. ''तान्हाजी चित्रपट करमुक्त कारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार SGST चा परतावा देणार आहे, मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील.'' असे थोरात यांनी म्हटले होते. थोरात यांच्या ट्विटला जवळपास 24 तास पूर्ण होत आहेत. तर, शुक्रवारचा दिवसही संपत आहे, मात्र अद्यापही तानाजी चित्रपट टॅक्स फ्री झाल्याची घोषणा किंवा अधिकृत पत्रक मुख्यमंत्र्यांकडून जारी करण्यात आलं नाही. विशेष म्हणजे तिकडे तानाजी चित्रपटाने 100 कोटींचा गल्लाही जमावला आहे. तर, उद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. पण, महाराष्ट्र सरकारकडून याबाबत कुठलिही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे, लवकरच घोषणा होईल म्हणजे नेमकं कधी होईल? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची #TanhajiTheUnsungWarrior चित्रपट करमुक्त करावा ही भूमिका आग्रहाने मांडली होती, असेही थोरात यांनी ट्विटमध्ये सांगितले होते.
अजय देवगणचा तानाजी आणि दीपिका पादुकोणचा 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तानाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तानाजी चित्रपटाने 2020 मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळवला आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला होता. त्यानंतर, हरियाणातील भाजपा सरकारनेही तानाजी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची वाट पाहात आहे.