Join us  

दहिसर ते कांदिवली मेट्रो देणार १०० कोटी; भाडे कमी ठेवण्यासाठी शोधणार पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 9:23 AM

प्रवाशांना गारेगार आणि परवडेल इतक्या भाड्यात प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने कंबर कसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मुंबई मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण मुंबई तसेच उपनगरात प्रवाशांना मेट्रोतून गारेगार आणि परवडेल इतक्या भाड्यात प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने कंबर कसली आहे. अलिकडेच कार्यान्वित करण्यात आलेल्या दहीसर ते आरे कॉलनी आणि पुढे डहाणूकरवाडी पर्यंतच्या मेट्रो २ ए आणि ७ या मार्गावरील १८ मेट्रो स्थानकांच्या माध्यमातून केवळ वर्षभरात १०० कोटींचा महसूल मिळविण्याचे ध्येय मेट्रोने समोर ठेवले आहे. त्यामुळे मेट्रोचे भाडे कमी ठेवता येणार असून मुंबईकरांना परवडेल अशा दरात गारेगार प्रवास करता येणार आहे.

मेट्रो २ ए आणि ७ या मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या माध्यमातून मेट्रोने जर १०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला तर हे भारतातील सर्वात कमी लांबीचे आणि सर्वाधिक महसूल मिळविणारे मार्ग ठरणार आहेत. सध्या मेट्रो मार्गावर तीन किलोमीटरमागे १० रुपये प्रवास भाडे आकारले जाते तर ३० किलोमीटरसाठी जास्तीत जास्त ५० रुपयांपर्यंतचे प्रवास भाडे आकारण्यात येते. या दोन्ही मार्गावर म्हणजेच दहीसर ते आरे कॉलनी ते कांदिवलीतील डहाणूकरवाडी पर्यंतच्या मार्गावर एकूण १८ मेट्रो स्थानके येतात. या स्थानकांमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक संकल्पना राबवून महसूल मिळवण्याची मेट्रो प्रशासनाची  योजना आहे. 

या माध्यमातून मिळणार महसूल

रिटेल, फूड, विविध प्रकारची पेय, एटीएमसाठी जागा भाड्याने देणे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पेये, जाहिरातींचे हक्क, टेलिकॉम टॉवरचे अधिकार, टीव्ही मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी भाडेे आकारणे, विविध उत्पादनांच्या जाहिराती, ऑप्टिकल फायबर केबलचे अधिकार अशा विविध माध्यमांतून मेट्रो महसूल प्राप्त करणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई