मुंबई : महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही मार्गांवरील एकूण १00 महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल मध्य रेल्वेवर २ आॅक्टोबरपासून सेवेत दाखल होणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर सीसीटीव्ही असणाऱ्या तीन लोकल सेवेत दाखल झाल्या असल्याचे सांगण्यात आले. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर सातत्याने हल्ले होत असून, त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे पाहता महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. पश्चिम रेल्वेमार्गावरील एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आणि त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील तीन लोकलमधील नऊ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या लोकल सेवेत दाखल झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. त्याचबरोबर आणखी १७ लोकलमधील ५0 महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. मरे व परेवरील सीसीटीव्ही मार्च २0१६ पर्यंत बसवण्यात येतील, सांगण्यात आले.----आमच्याकडून १७ लोकलमधील महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे. त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. - शरत चंद्रायन, पश्चिम रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारीकुर्ला कारशेडमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम करण्यात आले आहे. - नरेंद्र पाटील, मध्य रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी
१00 महिला डब्यांत सीसीटीव्ही लावणार
By admin | Published: October 01, 2015 3:23 AM