मुंबई- लहानपणी कोणत्याही वस्तू, वा तत्सम पदार्थ तोंडात घालण्याची सवय जीवावर बेतू शकते. नुकतेच वाडिया रुग्णालयात १० वर्षांच्या मुलीच्या पोटातून १०० ग्रॅम केस काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. स्वतःचे ओढलेले केस खाण्याची सवय या मुलीच्या जीवावर बेतली असती, मात्र वेळीच हे लक्षात आल्याने तिचा जीव वाचला आहे. दादर येथील दहा वर्षाच्या मुलीने केस खाल्ल्याने तिच्या पोटात गोळा तयार झाला. यामुळे तिला सातत्याने तीव्र वेदना होत होत्या. सुमारे दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना पोटातील केस काढण्यात यश आले आहे, आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे शिवाय वेदनांमधून तिला सुटका मिळाली आहे.
या मुलीला नऊव्या वर्षी मासिक पाळी आली, त्याची काही औषधे सुरु होती. तिला खूप रक्तस्त्राव होत होता. मात्र अचानक पोटात वेदना होऊ लागल्या, उलट्या येणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून लागली. यावेळी तिच्या वैद्यकीय तपासण्यानंतर या वेदना ओटीपोटाशी संबंधित असल्याचे दिसून आले. रुग्णाला तिच्या पोटाला स्पर्श करताना गाठ असल्यासारखे जाणवले आणि तिने हे तिच्या आईला सांगितले.
त्यानंतर त्वरित रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाल शल्यचिकित्सक डॉ पराग करकेरा सांगतात यांनी तपासणी केली. डॉ. करकेरा यांनी सांगितले, रुग्णाच्या पोटात गाठ असल्याचे जाणवली. ओटीपोटात दुखत असलेले रुग्ण नियमितपणे येतात परंतु तेथे गाठ जाणवत नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या सिटीस्कॅनमध्ये ट्रायकोबेझोअर दिसले म्हणजेच पोटातील केसांचा गोळा होता आणि त्याचा काही भाग लहान आतड्यात गुंतल्याचेही समोर आले. केस विरघळण्यास सक्षम नसतात, म्हणून पचनसंस्थेत राहतात आणि नंतर बॉलच्या आकारातील गोळा किंवा वस्तुमानात रूपांतरीत होतात. केसांचा गोळा काढून टाकण्यासाठी लॅपरोटॉमीचा सल्ला देण्यात आला. या उपचार पद्धतीत केस काढण्यासाठी पोटात एक छिद्र तयार करावे लागते.