मुंबई विमानतळावर १०० किलो गोल्ड पोटॅशियम सायनाइड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:20+5:302021-07-14T04:09:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये तब्बल १०० किलो गोल्ड पोटॅशियम सायनाइड जप्त करण्यात आले ...

100 kg gold potassium cyanide seized at Mumbai airport | मुंबई विमानतळावर १०० किलो गोल्ड पोटॅशियम सायनाइड जप्त

मुंबई विमानतळावर १०० किलो गोल्ड पोटॅशियम सायनाइड जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये तब्बल १०० किलो गोल्ड पोटॅशियम सायनाइड जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे ३२ कोटी इतके आहे. याप्रकरणी महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) दोघा जणांना अटक केली आहे.

मुंबईतील एका कंपनीकडून अवैधरीत्या गोल्ड पोटॅशियम सायनाइड दुबईला निर्यात केले जाणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. इलेक्ट्रोप्लेटिंग पद्धतीने धातूच्या वस्तूंवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी त्याचा वापर होतो. कर चुकवण्याच्या हेतूने मुंबईतील एका एजन्सीकरवी नियमबाह्य पद्धतीने हा मुद्देमाल दुबईला पाठविण्यात येणार होता. दुबईतील संबंधित कंपनी या एजन्सीशी जोडली गेली होती. इमिग्रेशन विभागाकडे नोंदणी करताना हा मुद्देमाल करमुक्त सोन्यापासून तयार केल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित आस्थापनाकडे त्याचा परवाना असल्याची बतावणीही करण्यात आली होती.

अ‍ॅडव्हान्स ऑथरायझेशन नियमानुसार, ज्या परदेशी कंपनीकडून करमुक्त सोने मागविले, त्याच कंपनीला त्यापासून बनविलेल्या वस्तू निर्यात करणे अनिवार्य आहे. या वस्तूंच्या निर्यातीवर कोणताही कर आकारला जात नाही. पण मुंबईस्थित या एजन्सीने नियमांना बगल दिली. त्यांनी गांधीनगर येथील एका कंपनीकडून सोने विकत घेतले. ही कंपनी सौरऊर्जेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करते. त्यांनी इंडोनेशियाहून करमुक्त सोने मागविले होते.

इंडोनेशियातून आयात केलेल्या करमुक्त सोन्यापासून गोल्ड पोटॅशियम सायनाइड तयार करण्यात आले आणि दुबईत पाठविण्यासाठी त्याची नोंदणी केली. आपल्याकडे त्याबाबतचा परवाना असल्याची बतावणीही करण्यात आली. हे सोने दुबईमार्गे अवैध पद्धतीने पुन्हा इंडोनेशियाला पोहोचविण्यात येणार होते. अशाप्रकारचा गैरव्यवहार नियमितपणे सुरू असून, आतापर्यंत ३३८ कोटींची करचुकवेगिरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 100 kg gold potassium cyanide seized at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.