मुंबई : केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मागील दोन वर्षांत शहर उपनगरात १०० माता मृत्यू झाल्याची नोंद आहे. या अहवालात २०२०-२१ एप्रिल ते जून कालावधीत ५१ मातांचा मृत्यू झाला आहे, तर २०१९-२० साली हे प्रमाण ४९ इतके होते. त्यामुळे परिणामी, दोन्ही वर्षांत एकूण १०० मातांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव हे प्रामुख्याने कारण आढळले आहे. तसेच तिशीनंतर माता होण्याचे प्रमाण अलीकडे वाढते आहे. याचाही माता मृत्युदर वाढण्यावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
२०११ पासून माता मृत्युदर वाढतो आहे. २०१६ पर्यंत हा दर २०० वर पोहोचला. दरम्यान, उपनगरीय रुग्णालयांवर विशेष भर पालिकेने दिल्यानंतर तो कमी करण्यात पालिकेला काही प्रमाणात यश आले. २०१८ साली शहरात माता मृत्युदर १४४ नोंदला होता, परंतु हे आशादायक चित्र अल्पजीवी ठरले आहे. २०१९ या वर्षभरात माता मृत्युदर पुन्हा वाढून २०१४ इतका झाला आहे. जानेवारी ते २७ डिसेंबपर्यंत शहरात २५४ मातांचा मृत्यू झाला असून यात १२९ शहरातील, तर १२५ शहराबाहेरील मातांचा समावेश आहे. दर एक लाख प्रसूतीमागे (लाइव्ह बर्थ) मातांचा मृत्यू यानुसार हा दर ठरतो.
नऊ महिन्यांमध्ये महिलांचा आहार, फॉलिक अॅसिडसारखी औषधे याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रक्तक्षय निर्माण होतो. या महिलांना प्रसूतीनंतर थोडा जरी रक्तस्राव झाला तरी शरीराला धोका होण्याचा संभव असतो. त्यामुळेही रक्तस्रावाच्या कारणाने मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आढळते. तसेच गर्भावस्थेत संसर्गजन्य आजारांची होणारी लागण हेही मातामृत्यूचे अजून एक कारण असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश मयेकर यांनी मांडले. रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्ये योग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव यामुळे तिथे नोंदणी करूनही भविष्यात योग्य उपचार मिळावेत म्हणून पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्येही माता नोंदणी करतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्यसेवेच्या विकासावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रागिणी शंकर यांनी सांगितले.
चौकट
मातामृत्यूची कारणे -
प्रसूतिपूर्व उच्च रक्तदाब
प्रसूतिपूर्व व पश्चात अतिरक्तस्राव
प्रसूतिपश्चात किंवा गर्भपातपश्चात जंतुदोष व रक्तक्षय
नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे
अकाली जन्माला आलेले बाळ
जन्मतः कमी वजनाचे बालक
जंतुसंसर्ग, न्यूमोनिया
सेप्सीस, जन्मतः श्वासवरोध, आघात
रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम