Join us

१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण; प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 11:16 AM

मोहीम यापुढेही सुरू ठेवू, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

मुंबई : छतावर सौर ऊर्जा निर्मितीचे पॅनेल्स बसवून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्राने दिलेले १०० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले असून, ही मोहीम यापुढेही सुरू ठेवू, असे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान, छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येत आहे.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज २ अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षांत घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दिष्ट २५ सप्टेंबर रोजी, म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले.

केंद्राकडून चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांना याविषयीची माहिती https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते.

 तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते.

वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतच हाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते.

हाऊसिंग सोसायट्यांना ५०० किलोवॅटपर्यंतचा प्रकल्प बसवता येतो. सार्वजनिक सुविधेसाठीच्या प्रकल्पांना प्रति किलोवॅट ७२९४ रुपये अनुदान मिळते.

रुफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या

२०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते. त्यांची क्षमता २० मेगावॅट होती.