मुंबईतील १५०० शाळांची शंभर नंबरी कामगिरी, १०० टक्के निकालवाल्या शाळा ६५ टक्क्यांनी वाढल्या
By रेश्मा शिवडेकर | Published: May 27, 2024 08:06 PM2024-05-27T20:06:52+5:302024-05-27T20:07:18+5:30
SSC Exam Result: सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकालात शंभर नंबरी कामगिरी करणाऱया शाळांची संख्या मुंबईत यंदा ६५ टक्क्यांनी वाढली आहे. दीड हजाराहून अधिक शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी मुंबईतील ९८९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता.
- रेश्मा शिवडेकर
मुंबई - सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकालात शंभर नंबरी कामगिरी करणाऱया शाळांची संख्या मुंबईत यंदा ६५ टक्क्यांनी वाढली आहे. दीड हजाराहून अधिक शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी मुंबईतील ९८९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. राज्यात ९,३८२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ६,८४४ इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरच्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महापालिकेच्या उर्दू शाळाही यात मागे नाही. शिवडीच्या उर्दू सेकंडरी पालिका शाळेतील सर्वच्या सर्व ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सहा जण विशेष प्राविण्यासह तर ११ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
भांडुपच्या सरस्वती विद्या मंदिर शाळेचे ७८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. अंबरनाथच्या पी.एम.एम. रोटरी स्कुलचेही सर्व १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या ५० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत अव्वल कामगिरी केली आहे.तर ८४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
पहिल्याच बॅचचे यश
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता जपत विविध जीवनकौशल्ये आत्मसात करण्यावर भर देणाऱया मनोरी येथील ऋषि वाल्मिका इको स्कुलच्या दहावीच्या पहिल्याच बॅचचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.
मोठी वाढ
२०२० ते २०२२ या कोविड काळात लागलेल्या दहावी परीक्षेचे निकाल वगळले तर १०० टक्के निकाल नोंदवणाऱया शाळांची संख्या इतकी कधीच वाढली नव्हती. २०१९मध्ये १०० टक्के निकाल नोंदवणाऱया मुंबईत अवघ्या ३३१ शाळा होत्या. २०२३ मध्ये (सर्वसाधारण परिस्थिती) या शाळांची संख्या ९८९ वर गेली. यंदा तर त्यात ६५ टक्के वाढ झाली आहे.
सलग सातव्यांदा
दादरच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कुलचा निकाल सलग सात वर्षे १०० टक्के लागतो आहे. यंदाही शाळेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
१०० टक्के निकाल लागलेल्या मुंबईतील शाळांची संख्या
२०२४ - १,५३३
२०२३ - ९८९
२०२२ - १,९७५ (कोविडकाळ)
२०२१ - ३,७७५(कोविडकाळ)
२०२० - १,७१४(कोविडकाळ)
२०१९ - ३३१ (सर्वसाधारण परिस्थिती)
पाच शाळांचा निकाल शून्य
यंदा शून्य टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्याही खूप घटली आहे. गेल्या वर्षी ८ शाळांचा निकाल शून्य लागला होता. यंदा अवघ्या पाच शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. कोविडपूर्व काळात म्हणजे २०१९ साली तो १३ इतका होता.