चेतन ननावरे, मुंबई - ३१ मेपर्यंत मुंबईतील नालेसफाई पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यासाठी १ एप्रिलपासूनच नालेसफाईला सुरुवात झाली़ मात्र, आजही शहरातील नाल्यांची स्थिती पाहता १०० टक्के नालेसफाई अशक्य आहे. नाल्यांसाठी प्रशासनाने २३ कोटींचा निधी उपलब्ध केला. शिवाय, मुदत संपण्याच्या १० दिवसांआधी ७५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला. याबाबत, पर्जन्य जल विभागाचे प्रमुख अभियंता आणि संचालक लक्ष्मण व्हटकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, शहरात मोठ्या नाल्यांच्या सफाईची जबाबदारी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. त्यातून निघालेल्या गाळाची विल्हेवाटही कंत्राटदारांनाच लावायची आहे. पोकलेनच्या मदतीने कंत्राटदार नालेसफाई करतात. नाल्यात पोकलेन उतरवण्यासाठी पंटूनची मदत घेतली जाते. त्यानंतर, पोकलेनच्या साहाय्याने गाळ उपसून नाल्याशेजारीच टाकला जातो. साधारणत: २४ तासांनंतर आणि ४८ तासांच्या आत उपसलेला गाळ डम्परच्या साहाय्याने शहराबाहेर नेऊन टाकावा लागतो. कंत्राटदारांवर पालिका अधिकार्यांची करडी नरज आहे. गाळ टाकण्यास मुलुंड, देवनार आणि कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवर बंदी आहे. कंत्राटदारांना तो शहराबाहेर जाऊन टाकावा लागतो. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेतर्फे व्हेहिकल ट्रँकिंग मशीनचा वापर केला आहे. त्यामुळे गाळ भरलेल्या गाडीचे ठिकाण समजण्यास मदत होत असल्याचे व्हटकर यांनी सांगितले. (क्रमश:)
१०० टक्के नालेसफाईच्या बाताच
By admin | Published: May 26, 2014 3:40 AM