मुंबई : एकीकडे प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असतानाच, दुसरीकडे नफ्यातील लांब व मध्यम पल्ल्याच्या १00 बस फेऱ्या बंद करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण देत फेऱ्या बंद करण्यात आल्याने एसटीच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड आगारांतील फेऱ्यांचा समावेश आहे. एसटी महामंडळ सध्या ‘वडाप’सारख्या अवैध वाहतुकीमुळे हैराण आहे. राज्यात वडापसारख्या वाहनांचे एकूण दररोज १६ ते १७ कोटी रुपये उत्पन्न असून, त्यामुळे एसटीचे उत्पन्न बुडत आहे. वडापकडे वळलेला प्रवासी पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ५५ टक्क्यांपेक्षा जास्त भारमान असलेल्या फेऱ्या या फायद्यातील फेऱ्या मानल्या जातात. मात्र, या नियमाला फाटा देत ५७ टक्के ते ७८ टक्के भारमान असलेल्या एसटीच्या मध्यम व लांब पल्ल्याच्या फेऱ्याच बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईतील १४, ठाणे आगारातील ३८, भिवंडीतील १३, शहापूरमधील २, कल्याण आगारांतील १२, मुरबाडमधील ८, विठ्ठलवाडीतील १० आणि वाडा आगारांतील ३ बस फेऱ्यांचा समावेश आहे. या फेऱ्या बंद केल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होतील. (प्रतिनिधी)
नफ्यातील १०० फेऱ्या रद्द होणार
By admin | Published: July 14, 2016 3:50 AM