बेस्टच्या ताफ्यातील १०० एसटी मूळ आगारात परत जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:23 AM2021-02-05T04:23:26+5:302021-02-05T04:23:26+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलसेवा बंद होती. त्यामुळे बेस्टच्या मदतीला एसटी पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलसेवा बंद होती. त्यामुळे बेस्टच्या मदतीला एसटी पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवासमुभा देण्यात येत असल्याने १०० एसटी मुंबईकरांच्या वाहतुकीतून माघारी बोलाविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या एसटी पुन्हा आपल्या मूळ आगारात जाणार असल्याने बेस्टच्या सुमारे २०० फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली. एसटीनेही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान, मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी १००० एसटीच्या बस बेस्ट मार्गावर धावत आहेत; पण सोमवारपासून सर्वांसाठी ठरावीक वेळेत लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीने आपल्या १०० बस परत बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अद्यापही सर्वांसाठी पूर्ण वेळेत लोकल सेवा सुरू झालेली नाही. यामुळे टप्प्याटप्प्याने एसटीच्या बस मुंबईतील वाहतुकीतून कमी करण्यात येणार आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मुंबईबाहेरून आलेल्या चालक-वाहकांची राहण्याची सोय ओयो रुम्स आणि कासा होम्स या ठिकाणी करण्यात आली होती. महामंडळाने यांना पत्रव्यवहार करत, सदर कर्मचारी पुन्हा संबंधित विभागात जाणार आहेत, यामुळे ३१ जानेवारीपासून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू नये, असे आदेश दिले आहेत.
या आगारातील फेऱ्या होणार कमी
१) काळा किल्ला, मालवणी, मालाड आणि मागठाणे या बेस्ट आगारातील प्रत्येकी २५ गाड्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे महामंडळाच्या वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
२) कमी करण्यात आलेल्या एसटी रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागात पाठवण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.