दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षार्थींसाठी १०० टक्के अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:07 AM2021-02-09T04:07:55+5:302021-02-09T04:07:55+5:30

शिक्षण मंडळ; नियमित परीक्षार्थ्यांसाठी २५ टक्के कपातीचा भाग वगळून परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जे विद्यार्थी यंदा दहावी-बारावीच्या ...

100% syllabus for 10th, 12th re-examinees | दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षार्थींसाठी १०० टक्के अभ्यासक्रम

दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षार्थींसाठी १०० टक्के अभ्यासक्रम

Next

शिक्षण मंडळ; नियमित परीक्षार्थ्यांसाठी २५ टक्के कपातीचा भाग वगळून परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जे विद्यार्थी यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांना नियमित व माेजके विषय घेऊन बसणार आहेत ते शासनाने अभ्यासक्रमात केलेल्या २५ टक्के कपातीचा लाभ घेऊन परीक्षा देऊ शकतील, तर पुनर्परीक्षार्थींना १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या दोन ते दोन महिन्यांवर असताना अजूनही विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबत संभ्रम असल्याने शाळा मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाकडून ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.

काेराेना संसर्ग व लाॅकडाऊनमुळे यंदा मार्च २०२० पासून राज्यातील ऑफलाईन शिक्षण बंद झाले. मागील डिसेंबर महिन्यापासून राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने अर्ध्याच उपस्थितीत सुरू आहेत. पण, अजूनही मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या शहरी भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शासनाकडून दहावी, बारावी बोर्डांच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत परीक्षा असून, या काळात ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकविलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनांनी मांडले.

* संघटनांची ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणी

अभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी, विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करावा, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

...................................

Web Title: 100% syllabus for 10th, 12th re-examinees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.