१०० वर्षांची ‘कुडाळ देशकर’ वाडी
By Admin | Published: April 22, 2016 02:22 AM2016-04-22T02:22:40+5:302016-04-22T02:22:40+5:30
मुंबईतील चाळ संस्कृतीचा उत्साह, परंपरा, सार्वजनिक उत्सव गिरगावातील कुडाळ देशकर वाडीमध्ये गेल्या १०० वर्षांपासून जतन करण्यात येत आहेत
लीनल गावडे, मुंबई
मुंबईतील चाळ संस्कृतीचा उत्साह, परंपरा, सार्वजनिक उत्सव गिरगावातील कुडाळ देशकर वाडीमध्ये गेल्या १०० वर्षांपासून जतन करण्यात येत आहेत. मराठमोळ््या कुटुंबांचे वास्तव्य असलेली ही वाडी म्हणजे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी एक चालती-बोलती वास्तु आहे.
गिरगाव येथील जगन्नाथ शंकरशेट मार्गावर कै. रा.ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाले चॅरिटीचा कुडाळदेशकर गौड ब्राम्हण निवास म्हणजेच ‘कुडाळदेशकरवाडी’ वसलेली आहे. या वाडीत पाच इमारती आहेत. मुंबईच्या गजबजाटाला ही सोसायटी अपवाद आहे. कारण या वाडीत मुंबईत अपवादाने आढळणारी शांतता आणि प्रसन्नता जाणवते. वाडीत शिरल्यावर उजव्या बाजूला गणपतीची भली मोठी इको फ्रेंडली आहे.
येथील रहिवाशांचा एकमेकांशी पिढ्यान्पिढ्यांचा संबध आहे. त्यामुळे ही संपूर्ण वाडी हे एक कुटुंब आहे या वाडीत फक्त कुडाळदेशकर राहतात. सणांच्या दिवशी धिंगाणा करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याकडे रहिवाशांचा भर असतो. येथील परंपरेविषयी सचिव सतीश सामंत अभिमानाने सांगतात की, अनेक महान व्यक्तिमत्वांचा सहवास वाडीतील रहिवाशांना लाभला आहे. नव्या पिढीनेही हा वारसा टिकवून ठेवावा असे वाटते. वाडीतील लोकांमधील एकोपा गेल्या कित्येक वर्षांचा आहे. सामाजिक कार्यातही वाडीने नेहमीच खारीचा वाटा उचलला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांना कुडाळदेशकरवाडी समाजाच्या संस्थेतून मदत करण्यात येते. (प्रतिनिधी)
दिग्गजांची उपस्थिती
वाडीत होणाऱ्या टोपीवाला व्याख्यानासाठी अनेक दिग्गज उपस्थित राहिले आहे. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत व्याख्यानमालेसाठी द्वारकानाथ संझगिरी, अभिनेते सुधीर जोशी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेता जयदेव हट्टंगडी, ज्येष्ठ सिनेकलाकार निळू फुले, लेखक गंगाराम गवाणकर, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक अशा अनेकांनी टोपीवाला व्याख्यांनाना हजेरी लावत व्याख्यानमाला फुलवली आहे.
कुडाळदेशकरवाडीत १९२६ च्या समुरास अनंत देसाई नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांचा टोप्यांचा व्यवसाय होता. यामुळे लोक त्यांना टोपीवाला संबोधत. देसाई अशिक्षित होते, पण त्यांना शिक्षणाची आवड होती.
ते कोकणचे सुपुत्र असल्यामुळे कोकणातून मुंबईत नोकरी, शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांची मुंबईत सोय व्हावी, यासाठी त्यांनी वाडीत वसतिगृह उभारले. विशेष म्हणजे हे वसतिगृह सर्वांसाठी विनामूल्य होते.
या वसतिगृहाच्या इमारतीत पालिकेची चौथीपर्यंतची शाळा ही भरत असे. या शाळेने ‘स. का. पाटील’, ‘दत्ता सामंत’, ‘एकनाथ ठाकूर’ असे विद्यार्थी घडवले. देसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टोपीवाला व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. गेल्या ४३ वर्षांपासून त्यांच्या स्मृतीदिनी ही व्याख्यानमाला घेण्यात येते.
> गिरगावचा गिरिजात्मक
येथील गणेशोत्सवाच्या परंपरेला ही ८८ वर्ष पूर्ण झाली आहेत. येथील गणपती ‘गिरगावचा गिरिजात्मक’ म्हणून ओळखला जातो. गेल्या ६ वर्षांपासून येथील गणपतीचे विसर्जन केले जात नाही. पाण्याचे होणारे प्रदुषण लक्षात घेत तरुणांनी हे पाऊल उचलले आहे.
या ठिकाणी इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या
दिवसात गणपतीची विसर्जन
मिरवणूक काढली जाते. पण गणपतीच्या चरणांवर
पाणी अर्पण करुन गणपतीची पुन्हा वाडीत प्रतिष्ठापना करण्यात येते.